पालिकेत कार्यालय मिळेपर्यंत आंदोलन
By admin | Published: March 24, 2017 04:05 AM2017-03-24T04:05:38+5:302017-03-24T04:05:38+5:30
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेते पदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. जागा मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या
पिंपरी : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेते पदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. जागा मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी महापौरांच्या दालनासमोरच कार्यालय सुरू केले आहे. खुर्च्या टाकून विरोधी पक्षनेत्यांनी सदस्यांशी चर्चा केली. कार्यालय मिळत नाही तोपर्यंत महापौर दालनाबाहेरच ठिय्या मांडणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेतेपदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. त्यासाठी आम्ही महापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांकडे मागणी केली आहे. मात्र, भाजपाने ही मागणी धुडकावून लावली आहे. राष्ट्रवादीचा हा स्टंट आहे, अशी टीका केली आहे. मात्र, हा स्टंट नसून आमचा पारदर्शी कारभार आहे, असा टोला विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी लगावला आहे. विरोधी कार्यालयातील सर्व खुर्च्या महापौर कार्यालयाबाहेरच्या मोकळ्या जागेत मांडून स्वत: विरोधी पक्षनेते बहल यांनी बाहेरच आपले विरोधी पक्षनेते कार्यालय थाटले आहे. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्यांच्या भुवया आपोआप उंचावल्या जात होत्या.
बहल म्हणाले की, विरोधी पक्ष असलो, तरी आमची सदस्यसंख्या ३६ आहे. आत्ताचे विरोधी पक्षनेते कार्यालय अतिशय छोटे आहे. त्याऐवजी आम्हाला उपमहापौर कार्यालय द्यावे किंवा इतर कोणतेही कार्यालय द्यावे जिथे आमचे ४० ते ४५ सदस्य बसू शकतील. याविषयी आम्ही आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापौर नितीन काळजे यांच्याकडे विनंती केली. मात्र, त्यांनी केवळ समजून घ्या एवढेच आश्वासन दिले. त्यासाठी आम्ही असे बाहेर कार्यालय थाटले आहे.’’
महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्याच काळातील ही रचना आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आत्ता आमचेही ७७ सदस्य आहेत. त्यांनाही महापौर किंवा सत्तारुढ पक्षनेत्यांच्या कार्यालयातही जागा पुरत नाही. सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.’’ (प्रतिनिधी)