मावळातील भातपीक आले धोक्यात, शेतकरी हवालदिल, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:05 AM2017-09-12T03:05:26+5:302017-09-12T03:05:29+5:30
भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक भागातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातपीक धोक्यात आले आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
करंजगाव : भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक भागातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातपीक धोक्यात आले आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
मावळ तालुक्यात, तसेच नाणे मावळात घनदाट जंगल आहे. नाणे मावळ या भागात अथवा परिसरात अनेक छोटी-मोठी गावे असून, त्यांमध्ये जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी,भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतजमिनीमध्ये भात पिकाची लागवड केली आहे. यामध्ये विविध जातीच्या पिकांचा समावेश आहे.
पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भातलागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मावळ तालुका हा भात पिकासाठी अग्रेसर आहे.
मात्र, या परिसरातील भात पिकावर करपा रोग पडत आहे. या करपा रोगामुळे या परिसरातील भात पिकांचे शेंडे पिवळे पडले आहे. भातपीक करपले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पिकांचा विमा द्यावा, तसेच पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. करपा रोगाचा पादुर्भाव वाढला आहे. भातावर मावळ तालुक्यात सर्वत्र जीवाणूजन्य करपा बॅक्टेरियल लीप ब्लाईट पडला आहे. रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉपर आॅक्सिक्लोराईड ३० ग्रॅम, स्टेप्टोसिलाईन ३ ग्राम, स्टिकर १५ मिली हे सर्व १५ लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी. तुडतुडे दिसत असतील, तर वरील इमॅडेक्लोप्राइड ३ मिली मिसळून फवारणी करावी, अशी माहिती कृषी सहायक एम. एम. शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.
एकीकडे कर्जमाफी होण्यासाठी शेतकरी बांधव कासावीस झाला असून, दुसरीकडे भात रोपावर करप्या रोग पडल्याने भातासाठी केलेला खर्चसुद्धा निघतो की नाही असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड म्हणाले.
नाणे मावळ या भागात अपेक्षित पाऊस न पडल्याने भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. करपा रोगामुळे या परिसरातील भातपीक पिवळे पडू लागले आहे. पीक धोक्यात आल्याची माहिती कोंडिवडे गावचे शेतकरी तुकाराम चोपडे यांनी दिली.
कृषी विभागामार्फत ज्या ठिकाणी करपा रोगाचा पादुर्भाव आहे. त्या ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या साह्याने भात पिकावर फवारणी करण्यात यावी. जेणेकरून भात पिकांवर नियंत्रण राखता येईल, अशी माहिती लक्ष्मण टाकवे यांनी दिली.
कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीची शेतकºयांना झळ पोचते. त्यासाठी प्रशासनानाने लवकरात लवकर पिकांचा विमा शेतकºयांना द्यावा. तसेच पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी साबळेवाडीचे शेतकरी नाना साबळे यांनी केली आहे.
ज्या ठिकाणी करया रोग भात पिकावर पडला आहे. त्या ठिकाणी वेळेत कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी गोवित्रीगावचे काशिनाथ जाधव यांनी केली आहे.
शासनाने त्यांच्या महसूल खात्यामार्फत चौकशी करून मंडलाधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून जो करपा रोगाचा पादुर्भाव पडला आहे. त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून शासनास अहवाल सादर करावा व शेतकºयाला मदत करावी, अशी मागणी संदीप आंद्रे यांनी केली आहे.
शेतक-यांनी चांगल्या प्रकारच्या भात पिकाची लागवड केली असूनदेखील रोग पडला आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी साई गावचे नामदेव पिंगळे यांनी केली.
कर्जमाफी होण्यासाठी शेतकरी बांधव आॅनलाइन अर्ज भरत आहे. अर्ज भरूनही कर्जमाफी होईल की नाही याबाबत शाश्वती नसताना दुसरीकडे भात पिकावर करपा रोग पडला आहे. या परिस्थितीने शेतकरी कासावीस झाला असल्याची व्यथा शेतकरी मधुकर गायकवाड पाटील यांनी मांडली.