मावळातील पेरण्या रखडल्या
By admin | Published: June 3, 2017 02:14 AM2017-06-03T02:14:24+5:302017-06-03T02:14:24+5:30
यंदा पाऊस वेळेवर पडणार असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी कामशेत सह नाणे मावळ, अंदर मावळ व आजूबाजूंच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कामशेत : यंदा पाऊस वेळेवर पडणार असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी कामशेत सह नाणे मावळ, अंदर मावळ व आजूबाजूंच्या शेती क्षेत्र असलेल्या भागात अजूनही मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी न लावल्याने भात पेरण्या रखडल्या आहेत.
मावळात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत आहे. पण, पाऊस काही केल्या बरसत नसल्याने अनेकांची भातपेरणी तसेच शेतीची इतर कामे थांबली आहेत. त्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने लगेच भातपेरणी करावी का नको, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला
आहे.
मावळ तालुका हा भाताचे आगार असून बहुतेक शेतकरी खरीप हंगामात भात पीक घेतात. या भात पिकाची लागवड करण्यासाठी आधी भात रोपवाटिका तयार कराव्या लागतात. प्रामुख्याने मे महिन्याच्या शेवटी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर या भात रोपवाटिकासाठी पेरणी केली जाते. ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पाण्यालगत आहेत. ते भातपेरणी उरकून पावसाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच भातलावणी सुरू करतात. इतर शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहावे लागत असून त्यानुसार नियोजन करावे लागत आहे.
अनेक तज्ज्ञ व जाणकार शेतकरी जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भात पेरणी केल्यास जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भात रोपे लागवडीसाठी तयार होतात, असा सल्ला देत
आहेत.
डोंगरालगत अथवा पाण्यापासून दूर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ढगाळ वातावरण व मॉन्सूनपूर्व पाऊस पडत नसल्याने चिंता वाढू लागल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाच्या आधी पेरणी केली तर बियाणे पिठाळून जाईल, दुबार पेरणीचे संकट येईल, जास्त पाऊस झाला तर पेरणी करता येणार नाही. तसेच भात रोपवाटिका जगवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. यात मोठा खर्च होतो, आदी समस्यांमुळे शेतकरी हैराण असून अनेक एकमेकांचा सल्ला घेऊन चर्चा करताना दिसत आहेत.