खासदार अमोल कोल्हे आले अन् महापालिकेत नगरसेवक झाले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:42 PM2021-10-21T12:42:49+5:302021-10-21T12:46:39+5:30
पिंपरी : महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. त्यास अचानकपणे प्रेक्षक गॅलरीत खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यामुळे आज ...
पिंपरी : महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. त्यास अचानकपणे प्रेक्षक गॅलरीत खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यामुळे आज सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांना कंठ फुटला. स्मार्ट सिटी भ्रष्टाचार, रस्ते खोदाई, आयुक्तांची कार्यपद्धती या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली.
पिंपरी - चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा अनेक महिन्यानंतर ऑफलाईन झाली. तसेच सभेत कसे कामकाज चालते, हे पाहण्यासाठी शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहिले. दुपारी सव्वा दोनला पक्षाचे खासदार स्वतः लॉबीमध्ये उपस्थित असल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. महिला सुरक्षा, स्मार्ट सिटी भ्रष्टाचार, रस्ते खोदाई या सर्वच गोष्टीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल यांनी शहरातील विविध प्रश्नावर जोरदार हल्ला चढविला. राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्याचे भाजपच्या नगरसेवकांनीही कौतुक केले. शाब्दिक टक्केटोणपे दिले. या नगरसेवकांना उपरोधिक टोलेही लगावले.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भाषणानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार भाषणे केली. तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. यावर बोलताना, खासदारांना दाखविण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे, हे ठीक आहे. पण भाजपचे नगरसेवकही खासदार कोल्हे यांच्यासमोर जोरजोरात भाषणे करत त्यांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा कानपिचक्या कलाटे यांनी दिल्या. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी स्मार्ट सिटीच्या कामावर टीका केली.