हिंजवडीतील 'त्या' पीडित मुलींच्या कुटुंबियांना खासदार प्रितम मुंडे यांनी दिला धीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:05 PM2018-09-24T17:05:42+5:302018-09-24T17:17:39+5:30
'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला.
पिंपरी : हिंजवडी परिसरात नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या कुटुंबियांची खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आज भेट घेतली व त्यांना धीर दिला. ' ताई, तुमच्या भेटीमुळे आम्हांला खरा आधार मिळाला आहे, आता तुम्हीच आमच्या माय-बाप आहात, अशा शब्दांत पीडितेच्या पित्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांना शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या या अत्याचाराची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या वतीने मुंडे यांनी आज हिंजवडी परिसरात राहणा-या 'त्या' पीडितेच्या आई वडिलांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. 'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अशोक मुंडे, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, तळेगांवचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियांका बारसे, केशव घोळवे आणि रवि खेडकर, दीपक नागरगोजे, आबा नागरगोजे, संतोष राख आदी उपस्थित होते.
.....................
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आणि पोलिस आयुक्तांशी फोनवर चर्चा
या घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी मुंडे यांनी यावेळी दूरध्वनीवरून चर्चा केली. घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा नये असे त्या म्हणाल्या. ही घटना अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे त्याचे भांडवल करू नका अथवा याबाबत सोशल मीडियामध्ये पसरविल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.