खासदारांना फोटो काढण्यातच रस, बारणेंवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:48 AM2018-08-29T01:48:01+5:302018-08-29T01:48:37+5:30
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरुवात करण्याचे आवाहन केले होते.
पिंपरी : शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरुवात करण्याचे आवाहन केले होते. परंतु, फोटो काढणारे खासदार या आवाहनामुळे प्रचंड चिडले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी राजकीय भांडवल करून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची संधी साधली आहे. त्यांना दिल्लीपेक्षा गल्लीतच जास्त रस आहे, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपा विरुद्ध शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी सुरू झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप असे शाब्दिक युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. ‘लोगों की समस्या की बात उठाने पर गुस्सा क्यो आता है’ आणि ‘आम्ही दोघे भाऊ मिळून सारे खाऊ’, अशी टीका बारणे यांनी जगताप यांच्यावर केली होती. त्यास जगताप यांनी उत्तर दिले. महापालिकेत खाबुगिरी असेल, तर पुरावे द्यायला कोणी अडविले आहे, असा सवाल जगताप यांनी केला आहे.