महावितरणचे डोके ठिकाणावर आहे का?
By admin | Published: June 30, 2017 03:45 AM2017-06-30T03:45:09+5:302017-06-30T03:45:09+5:30
वारंवार वीजपुरवठा खंडित, बिले उशिरा मिळणे, बिलातील रकमांमध्ये तफावत अशा महावितरण विरोधातील तक्रारींचा पाढा दिवसेंदिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वारंवार वीजपुरवठा खंडित, बिले उशिरा मिळणे, बिलातील रकमांमध्ये तफावत अशा महावितरण विरोधातील तक्रारींचा पाढा दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात भर म्हणून आता महावितरणने अंदाजे वीजबिले आकारण्यास सुरुवात केली आहे की काय, अशी शंका ग्राहकांकडून उपस्थित केली जात आहे.
मागील बिलावरून सरासरी बिले आकारण्याची महावितरणची जुनी खोड होती. ग्राहकांकडून तक्रारी वाढत चालल्यानंतर वीजबिलावर रीडिंग घेतले जाते, त्या वेळचे मीटरचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून पारदर्शकता येईल, असे ग्राहकांना वाटू लागले. काही दिवस बिलावर व्यवस्थित फोटो येऊ लागले. मात्र, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बिलावर येणारे छायाचित्र अस्पष्ट छापले जात आहे तर काही बिलांवर छायाचित्रच नसते. अशावेळी महावितरणने आकारलेले बिल मागील बिलांवरून सरासरी बिल टाकले जात असल्याची तक्रार केली जात आहे.
बिल थकल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात तत्परता दाखविण्याऱ्या महावितरणला मीटरची स्पष्ट छायाचित्र छापण्यास कोणती अडचण आहे? महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध सुशिक्षित ग्राहक तक्रार करू शकतात. मात्र, जे ग्राहक निरक्षर आहेत ते आलेले बिल निमूटपणाने भरत राहतात. त्यामुळे महावितरणचे फावत असून वारंवार अशी बिले पाठविण्याचा उपद्व्याप केला जातो.