शंभर पोलीस वर्ग झाल्याने चिखली पोलीस ठाण्याला मिळणार मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:16 PM2018-10-08T16:16:51+5:302018-10-08T16:20:23+5:30
निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून चिखली पोलीस ठाण्यासाठी एकूण १०० कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत.
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून चिखली पोलीस ठाण्यासाठी जादा पोलीस वर्ग करण्यात आले आहेत. निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून चिखली पोलीस ठाण्यासाठी एकूण १०० कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने चिखली पोलीस ठाणे लवकरच कार्यरत होणार आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी काढले आहेत.
चिखली पोलीस ठाण्यासाठी 5 सहा्यक फौजदार,२८ पोलीस हवालदार, २८ पोलीस नाईक, ४ महिला पोलीस नाईक, १९ पोलीस शिपाई, १६ महिला पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निगडी पोलीस ठाण्यातून ८१ , सांगवी पोलीस ठाण्यातून २ , चिंचवड पोलीस ठाण्यातून १ आणि नियंत्रण कक्षातून १६ असे पोलीस कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत.
चिखली पोलीस ठाण्याला मंजुरी मिळून ६ महिने उलटले, मात्र जुलै २०१८ मध्ये निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांची बदली चिखली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेच पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्याने या बदलावर फारसा परिणाम पडला नाही. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मागील आठवड्यात शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कारभारी बदलून मोठा फेरबदल केला. यातच पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले विवेक वसंत मुगळीकर यांची चिखली पोलीस ठाण्यात अंतर्गत बदली करण्यात आली. त्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने आता चिखली पोलीस ठाणे लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.