पिंपरी चिंचवडमधील वायसीएम हॉस्पिटलच्या आवारात बांधण्यात येणार बहुमजली इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:34 PM2017-11-29T13:34:32+5:302017-11-29T13:38:44+5:30

संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या आवारात बहुमजली इमारत बांधण्यात येणार असून ५० कोटी रूपयांच्या सुधारीत खर्चाला सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली.

A multi-storey building will be built in YCM hospital premises of Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमधील वायसीएम हॉस्पिटलच्या आवारात बांधण्यात येणार बहुमजली इमारत

पिंपरी चिंचवडमधील वायसीएम हॉस्पिटलच्या आवारात बांधण्यात येणार बहुमजली इमारत

googlenewsNext
ठळक मुद्देपदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सुरूवातीला पाच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताकामासाठी ५० कोटी रुपये सुधारीत अर्थसंकल्पीय रक्कमेची आवश्यकता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सुरूवातीला पाच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार असून ५० कोटी रूपयांच्या सुधारीत खर्चाला सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली. या शिवाय नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरिडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी २० कोटी आणि तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यासाठी ३० कोटी अशा एकूण १०० कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात पाच कोटी रूपयांची तरतूद केली असून सर्वसाधारण सभेत २० जूनला या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वायसीएम रूग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव ०.५० चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किर्टेक्ट शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएशन यांना सुधारित नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात रूग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर तसेच इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश आहे. या कामासाठी ५० कोटी रुपये सुधारीत अर्थसंकल्पीय रक्कमेची आवश्यकता आहे. हे काम तातडीने करायचे असल्याने महापालिकेची सुधारीत प्रशासकीय मान्यता गरजेची आहे. 

 

सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर
नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरअंतर्गत सुदर्शननगर चौकात सद्यस्थितीत सिग्नल व्यवस्था आहे. प्रवासी वाहतुक वेळेत बचत होऊन प्रदुषण कमी होण्यास मदत व्हावी, यासाठी चौक सिग्नल मुक्त करण्यासाठी ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामास महापालिकेच्या सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी २० कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.

 

भूसंपादनासाठी तीस कोटी
तसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच भूसंपादन होणार आहे. जागेचे संपादन झाल्यास रस्ता विकसित करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी हे कामही महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट केले आहे. या कामासाठी ३० कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी १०० कोटी रूपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता द्यावी, असे आयुक्तांनी प्रस्तावात नमूद केले. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

 

ट्रस्टची जागा रस्ता म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मागे 
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८-मासुळकर कॉलनी हा भाग अत्याधुनिक सोयीने विकसित होत आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व मुख्य रस्त्यावर होणाठया गाड्यांच्या वाहतुकीस पर्यायी उपलब्धता होणे अत्यंत गरजेचे आहे. टेल्को सिमाभिंती लगतचा रस्ता ते मोरवाडी आयटीआय रस्ता येथील अमृतेश्वर ट्रस्टची जागा नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ता म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार, आयुक्तांनी फ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग कार्यकारी अभियंता आणि अमृतेश्वर ट्रस्ट यांच्या सहमतीने हा पर्यायी रस्ता करण्यात आला. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार हा रस्ता घोषीत करण्याकरिता नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर एक हरकत आली. हरकतदारास सुनावणीस बोलावूनही अनुपस्थित राहिल्याने हरकत फेटाळली आहे. त्यानुसार, ही जागा रस्ता म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर दाखल होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विषयपत्र माघार घेत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. त्यामागील गौडबंगाल कायम आहे. 

Web Title: A multi-storey building will be built in YCM hospital premises of Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.