मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : कोट्यवधींची वसुली, सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 05:40 AM2017-11-13T05:40:25+5:302017-11-13T05:41:03+5:30
मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई व शैक्षणिक राजधानी पुणे ही शहरे कमीत कमी अंतरात वेगवान प्रवासाने जोडली जावीत. याकरिता देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाची निर्मिती २000 साली करण्यात आली. गेल्या १७ वर्षांत कोट्यवधीची टोलवसुली या मार्गावर केली. मात्र, या मार्गावर प्रवाशांना सुविधा देण्यात महाराष्ट्र शासन व टोल वसुली यंत्रणा अपयशी ठरली आहे. किवळे ते कळंबोली या ९४ किलोमीटर अंतराच्या द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी अद्याप ट्रामा केअरची सुविधा नाही. प्रवासी व वाहनचालकांसाठी पिण्याचे पाणी, विश्रांतीकरिता थांबा या सुविधा दिलेल्या नाहीत. मावळातील लगतच्या गावांना आजही सेवा रस्ता देण्यात आलेला नाही.
पेट्रोल पंपावर नाही स्वच्छतागृह
द्रुतगती मार्ग असो की राष्ट्रीय व राज्य मार्ग असो, या सर्व ठिकाणी असणार्या पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसे फलक संबंधित मालक व व्यावसायिकांनी लावावेत असे निर्देश असताना अद्याप तरी कोठे असे फलक व सुविधा देण्यात आलेल्या दिसत नसल्याने शासनाचे आदेश हे केवळ कागदावरच राहिले आहेत.
सेवा रस्त्याची प्रतीक्षा
वाहतूककोंडीदरम्यान तर प्रवासी व वाहनचालक यांना पिण्याचे पाणीदेखील तासन्तास मिळत नाही. या मार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पिड गन, कॅमेरा मॉनिटेरिंग, ड्रोन कॅमेरे असे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारात सातत्य नसल्याने येथील जीवघेणा वेग कायम आहे. द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली तेव्हाच मार्गाच्या दुतर्फा असणार्या गावांना सेवारस्ता देण्याचे करारात नमूद असताना शेतकरी व ग्रामस्थ सेवा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलने करत आहेत.
वाहनतळाची नाही सुविधा
४वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने हजारो प्रवासी या मार्गावर दगावले आहेत. तर अनेक जण जायबंद झाले आहेत. मार्गावर कोठेही वाहने उभी करण्याची सुविधा नसल्याने घाट चढताना किंवा उतरताना अवजड वाहने गरम होऊन अपघात घडतात. या ९४ किमी अंतराच्या मार्गावर फुडमॉल वगळता कोठेही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.