मुर्दाड राज्यकर्ते गुडघे टेकतील
By admin | Published: May 23, 2017 05:04 AM2017-05-23T05:04:08+5:302017-05-23T05:04:08+5:30
शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते. मात्र, सध्याची स्थिती मर जवान, मर किसान अशी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पिंपरीत आत्मक्लेश पदयात्रेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीवेळी देण्यात आलेल्या आश्वासनांना शेतकऱ्यांसह आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. त्यामुळे आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकांतील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
पुणे येथून सोमवारी सुरु झालेली आत्मक्लेश पदयात्रा ३० मेला मुंबईतील राजभवन येथे पोहोचणार आहे. दरम्यान, ही पदयात्रा सोमवारी दुपारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. या वेळी खासदार राजू शेट्टी यांनी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते रालोआला साथ दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू. यास आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. मात्र, आश्वासन हवेत विरले. आता केंद्र सरकार हात वर करीत आहे.’’
सध्या शेतकऱ्यांची पोरं सीमेवर मरताहेत आणि शेतकरीही मरताहेत. सध्या मर जवान, मर किसान अशी अवस्था आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी सरकारला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली. स्वामीनाथन यांच्या सूत्रांनुसार हमीभाव देण्याऐवजी शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगण्यात आले. मात्र, उत्पन्नाऐवजी कर्ज दुप्पट झाले. आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. दरम्यान, स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार हमीभाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रही सरकारने न्यायालयात सादर केले आहे.
दरम्यान, मोदींनी निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन अज्ञानातून दिले असल्याचे कबूल करावे किंवा भाजपाने शेतकऱ्यांना फसविण्यासाठी आश्वासन दिले होते हे कबूल करावे, असेही शेट्टी यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यासाठी आम्हीही जबाबदार आहोत. त्याचप्रमाणे सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसदेखील जबाबदार असून, याचे प्रायश्चित्त म्हणून ही पदयात्रा असल्याचे ते म्हणाले.
आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला पण आम्ही चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकातील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू. अरविंद सुब्रह्मण्यम्, ऊर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी व्यथित झाला आहे. शेतकरी इतके किरकोळ व नगण्य आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.