महापालिकेचे १३ घनकचरा स्थानांतरण केंद्र कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 20:30 IST2025-01-11T20:30:48+5:302025-01-11T20:30:58+5:30
आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत.

महापालिकेचे १३ घनकचरा स्थानांतरण केंद्र कागदावरच
पिंपरी : शहरात दररोज सुमारे १२०० टनापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी १६ ठिकाणी कचरा स्थानांतरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. यापैकी केवळ तीनच स्थानांतरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दोन अशी १६ केंद्रे उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यातील बहुतांश केंद्राची जागा ही लोकवस्तीच्या भागाला लागून असल्यामुळे नागरिकांची याबाबत नाराजी आहे. केंद्रे उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा ताबा मिळवण्यात महापालिकेला यश येताना दिसत नाही. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. सध्या कासारवाडी, भोसरी गवळीमाथा, आणि काळेवाडी येथे केंद्रे तयार केली आहेत. त्यातील काळेवाडी स्थानांतरण केंद्र मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे.
घनकचरा स्थानांतरण केंद्र पूर्णत
बंदिस्त असल्याने परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. एक केंद्र उभारण्यासाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून ४६ कोटी मिळाले आहेत. महापालिका घनकचरा स्थानांतरण केंद्राला कधी मुहूर्त मिळणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.