‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:42 IST2025-01-08T18:42:11+5:302025-01-08T18:42:54+5:30
रुग्णालयात करणार विलगीकरणाची व्यवस्था अन् रुग्ण सर्वेक्षण

‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर
पिंपरी : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या धर्तीवर शहरात रुग्णालयात विलगीकरणासाठी रुग्णशय्या आणि अतिदक्षता रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुग्ण आढळल्यानंतर व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्हीचा संसर्गाबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. कोरोना साथीनंतर महापालिकेने भविष्यात संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास रुग्णालयात रुग्णशय्यांची व्यवस्था केली आहे. भविष्यात एचएमपीव्हीची साथ वाढल्यास त्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयांत विलगीकरणासाठी रुग्णशय्यांची व्यवस्था आहे. याचबरोबर रुग्ण वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेऊन विलगीकरणासाठी व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
हे करा :
१. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
२. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
३. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
४. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
५. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटिलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
६. दररोज स्वच्छ धुतलेला रुमाल वापरा.
हे करू नये :
१. हस्तांदोलन
२. टिश्यू पेपरचा पुनर्वापर
३. आजारी लोकांशी जवळचा संपर्क
४. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
५. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
६. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
महापालिकेच्या हद्दीत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. हा व्हायरस श्वसनसंस्थेला संक्रमित करतो. हा साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे. त्यामध्ये फ्लूसारखी अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणे असतात. यामध्ये सर्दी, खोकला किंवा ताप असू शकतो. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना हा आजार लवकर होऊ शकतो. - डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका