पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेचा पुढाकार, आदर्श सोसायटीला देणार बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:10 AM2017-09-18T00:10:58+5:302017-09-18T00:11:03+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे.
पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. शहर हगणदरीमुक्त करणे, घनकच-याचे व्यवस्थापन करणे या अभियानांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना राबविण्यात येणार असून, विजेत्या सोसायट्यांना सामान्यकरात सूट देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहरे हगणदरीमुक्त करणे व घनकच-याचे व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. केंद्राच्या धर्तीवर १५ मे २०१५ पासून राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फेही शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, नागरिक यांच्या सहयोगाने हे अभियान राबविले जात आहे. आता या अभियानांतर्गत नागरिकांचा सहभाग वाढवून शहरातील गृहप्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक आणि स्वच्छताविषयक स्पर्धा घेण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यामुळे शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक होईल, कच-याची वाहतूक होऊन विल्हेवाट करण्यासाठी महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील विजेत्या सोसायट्यांना सामान्यकरात सूट देण्यात येणार आहे. १२ ते १०० फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी आणि १००हून अधिक फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा असणार आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांतून आठ सोसायट्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
तपासणीसाठी स्वतंत्र पथक
सोसायटीसंदर्भातील या स्पर्धेच्या तपासणीसाठी दोन पालिका अधिकारी, एक अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी व एक पत्रकार यांचे पथक असणार असून, त्यांनी दिलेल्या स्टार रेटिंग गुणांच्या आधारे संबंधित सोसायटीला सामान्य करात सूट देण्यात येणार आहे. त्यामध्ये ८६ ते १०० गुण मिळविणा-या सोसायटीला फाईव्ह स्टार रेंटिंग असणार असून, त्यांना सामान्य करात १५ टक्के सूट दिली जाणार आहे. ७६ ते ८५ गुण असणा-या व फोर स्टार रेटिंगच्या सोसायटीला १० टक्के, तर ६६ ते ७५ गुण प्राप्त व थ्री स्टार सोसायटीला पाच टक्के सामान्यकरात सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत महापालिकेतर्फे देण्यात येत असलेल्या सामान्य करातील सवलतींव्यतिरिक्त असणार आहे. ५१ ते ६५ गुण मिळविणा-या सोसायटीला दोन स्टार व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.