महापालिकेकडून सल्लागार व वास्तुविशारद नेमण्याचा धडाका, बॅडमिंटन हॉलसाठी वास्तुविशारद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 05:09 PM2019-03-06T17:09:32+5:302019-03-06T17:29:25+5:30
कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल परिसरात अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने सल्लागार आणि वास्तूविशारद नेमण्याचा धडाका लावला आहे. कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल परिसरात अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या कामासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना प्रकल्प किमतीच्या दोन टक्के एवढे शुल्क देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्थापत्यविषयक कामे सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहेत. ही प्रस्तावित विकासकामे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची आहेत. त्यात आकर्षक आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल परिसरात अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार
विविध कामे करण्यासाठी पुरेसे तांत्रिक नैपुण्य महापालिकेतील अभियंत्यांकडे उपलब्ध आहे. महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात आहेत. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग, गुंतागुंतीचे तांत्रिक प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, पर्यावरण विषयक, संशोधनात्मक अभ्यास, खासगीकरणातून करायच्या प्रकल्पांसाठी कायदेविषयक, अर्थविषेयक अशा बाबींसाठी वास्तुविशारद अथवा त्या क्षेत्रातील तज्ञ नेमण्याची आवश्यकता असते. या प्रकल्पाअंतर्गत विस्तृत व परिपूर्ण संकल्पचित्रे व आराखडे तयार करणे, काम वेशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मंजुर दरसुचीत समाविष्ट नसणाºया विविध बाबींचे दरपृथ:करण तयार करून त्यास मान्यता घेणे, निविदाविषयक आवश्यक कामे करणे, आदी निविदापूर्व कामे करण्यात येणार आहेत.
तांत्रिकदृष्ट्या आराखड्याप्रमाणे काम करून घेणे, प्रकल्पाच्या दैनंदीन कामावर देखरेख ठेवणे आदी निविदापश्चात कामे चोखपणे आवश्य क आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन महापालिकेच्या वास्तुविशारद पॅनेलवर असलेले या क्षेत्रातील तज्ञ वास्तुविशारदांची नेमणूक करणे आवश्यक आहे. महापालिका पॅनेलवरील तज्ञ वास्तुविशारद यांच्याकडून ही कामे करून घेण्यासाठी महापालिका वेबसाईटवर १२ जुलै २०१८ रोजी दरपत्रक नोटीस प्रसिद्ध केली होती. प्राप्त दरांची तुलना केली असता अर्थस्केप आकिर्टेक्ट व कन्सल्टंट यांचा लघुत्तम दर प्राप्त झाला आहे. या वासतुविशारदातर्फे महापालिका शहर अभिंयता यांच्या दालनात २५ ऑक्टोबर रोजी सादरीकरण केले. त्यानुसार, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल परिसरातील निविदापूर्व आणि निविदापश्चात स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी अर्थस्केप आकिर्टेक्ट यांची नेमणूक केली असून त्यांना प्रकल्प किमतीच्या दोन टक्के शुल्क देण्यात येणार आहे.