महापालिकेतील लेट लतीफांना बसणार चाप
By admin | Published: June 13, 2017 04:13 AM2017-06-13T04:13:22+5:302017-06-13T04:13:22+5:30
महापालिकेच्या कार्यालयामध्ये वेळेवर येणे, ओळखपत्र लावणे, गणवेश परिधान करणे, बायोमेट्रिक हजेरी, जेवणाची सुटी संपल्यानंतर वेळेवर कामकाज सुरू करण्याच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेच्या कार्यालयामध्ये वेळेवर येणे, ओळखपत्र लावणे, गणवेश परिधान करणे, बायोमेट्रिक हजेरी, जेवणाची सुटी संपल्यानंतर वेळेवर कामकाज सुरू करण्याच्या नियमांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी करावी, असे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नव्याने काढले आहे. यामुळे कामाच्या वेळेत टंगळमंगळ करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.
प्रभावी, लोकाभिमुख प्रशासनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सरकारच्या आदेशानुसार कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या दैनंदिन उपस्थितीसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित केली आहे. या नियमांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालन करणे गरजेचे आहे. परंतु, महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन शिस्तीचे व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचे पालन करीत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे.
महापालिकेत कार्यालयात प्रवेश करताना ओळखपत्र लावावे, पदानुसार विहित केलेला गणवेश परिधान करावा, कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून इतरत्र फिरू नये, भोजनाची सुटी संपल्यानंतर वेळेत कार्यालयात हजर राहावे,अधिकारी व कर्मचारी एका महिन्यात तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्यास संबंधितांची किरकोळ रजा खर्ची टाकावी. रजा शिल्लक नसल्यास अर्जित रजा खर्ची टाकावी. सदरची कार्यवाही दरमहा करावी. याबाबत निर्गत केलेल्या आदेशाची नोंद सेवानोंद पुस्तकात घ्यावी व रजा वजावट करून केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील महिन्याच्या पंधरा तारखेपूर्वी प्रशासन विभागाकडे पाठवावा. ज्या महिन्यात एकही कर्मचारी उशिरा आले नसल्यास त्या महिन्याचा निरंक अहवालदेखील प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा, असे आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे.
अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई
अधिकारी, कर्मचारी यांच्या तीन लेटबाबतची कार्यवाही कार्यरत असलेल्या विभागाने दरमहा करावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाल्यास तीन लेटबाबतची कार्यवाही पूर्ण केल्याबाबतचा दाखला अंतिम वेतन प्रमाणपत्रासोबत स्थानांतरण झालेल्या विभागाकडे पाठवावा, अधिकारी, कर्मचारी यांनी दैनंदिन हजेरी बायोमेट्रिकद्वारे नोंदवावी. कर्मचाऱ्याचे स्थानांतरण झाल्यास, स्थानांतरण झालेल्या विभागातील मशिनवर हजेरी शाखाप्रमुखाच्या लेखी परवानगीने करावे. पूर्वीच्या विभागातील मशिनवर
असलेले संबंधित कर्मचाऱ्याचे हजेरी रजिस्ट्रेशन करीत असल्याबाबत संबंधित कर्मचाऱ्याकडून लेखी दाखला घ्यावा.
नियुक्तीच्या ठिकाणी हजेरी बंधनकारक
कार्यालयाने नेमून दिलेल्या, कार्यरत असलेल्या मशिनव्यतिरिक्त एकापेक्षा अधिक मशिनवर हजेरी केल्याचे लोकेशन शिट अहवालावरून निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टेबलकडील सर्व रेकॉर्ड अभिलेख नियमानुसार अद्ययावत ठेवण्यात यावेत. कार्यालयीन कामासाठी फिरती करणाऱ्या अधिकाऱ्यांना फिरती भत्ता दिला जातो. फिरती भत्ता हा नेमणूक दिलेले कार्यालयाचे ठिकाण ते फिरतीचे ठिकाण यासाठी अदा केला जातो.
काही अधिकारी, कर्मचारी हे नेमून दिलेल्या कार्यालयाऐवजी दुसऱ्या ठिकाणी हजेरी दाखवित असल्याचे लक्षात आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयाच्या फिरती डायरीमध्ये कार्यालयाचे ठिकाण ते फिरतीचे ठिकाण नमूद करून फिरती भत्ता घेतात, हे चुकीचे असून अशाप्रकरणी अदा केलेला फिरती भत्ता वसूलपात्र होऊन संबंधित अधिकारी, कर्मचारी कारवाईस पात्र राहील, असे परिपत्रकात नमूद केले आहे.बायोमेट्रिक थम्ब अहवालानुसार भत्ता अदा करण्याची दक्षता शाखाप्रमुखांनी घ्यावी.