वाढीव बांधकामांकडे महापालिकेचे दुर्लक्ष
By admin | Published: November 23, 2015 12:43 AM2015-11-23T00:43:50+5:302015-11-23T00:43:50+5:30
एकीकडे न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू असताना, शहरात अनेक भागांत वाढीव बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.
पिंपरी : एकीकडे न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू असताना, शहरात अनेक भागांत वाढीव बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने शहराच्या बकालपणात भर पडत आहे.
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नेमलेल्या बीट निरीक्षकांच्या डोळ्यांदेखत वाढीव बांधकामे पूर्ण होत आहेत. पिंपरी बाजारपेठेत दुमजली इमारती तीनमजली झाल्या. अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या भीतीने अर्धवट ठेवलेली बांधकामे महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पूर्ण झाली. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये आजमितीस राजरोसपणे वाढीव बांधकामे सुरू आहेत. बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून नागरिक वाढीव बांधकामे करू लागले आहेत. वाढीव बांधकाम रोखण्याचे तर दूर राहिले. वाढीव बांधकामांची नोंदणी करून त्यांच्याकडून वाढीव क्षेत्राचा मिळकत कर वसूल करण्याचेही भान अधिकाऱ्यांना राहिले नाही. उत्पन्नात भर पडेल, असे साधन उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जे प्रामाणिक करदाते आहेत, त्यांच्यावरच कराचा बोजा टाकला जात आहे. येत्या अर्थसंकल्पात वाढीव मिळकत कराचे प्रस्ताव पुढे येतील. बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून मिळकतकर वसूल करण्याचा शहाणपणा अधिकारी दाखविणार नाहीत. (प्रतिनिधी)