महापालिकेचा ‘स्मार्टनेस’ खड्ड्याते, नागरिकांचे हाल, वाहनचालकांना करावी लागते कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:03 AM2018-07-14T02:03:57+5:302018-07-14T02:05:35+5:30
पावसामुळे मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर खड्डे झाले. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून याचा इन्कार करण्यात येत होता. शहरातील रस्ते खड्डेमुक्त आहेत, असा दावा महापालिका प्रशासन करीत होते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही मोठ-मोठे खड्डे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पावसामुळे मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर खड्डे झाले. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून याचा इन्कार करण्यात येत होता. शहरातील रस्ते खड्डेमुक्त आहेत, असा दावा महापालिका प्रशासन करीत होते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही मोठ-मोठे खड्डे झाले आहेत. पावसाचे पाणी साचून अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत, त्याचा लोकमत पाहणीतून घेतलेला हा आढावा.
रहाटणी : अवघ्या काही वर्षांत पिंपळे सौदागरचा नियोजनबद्ध विकास करण्यात आल्याने बहुतेक नागरिक वास्तव्यासाठी याच भागाला पसंती देताना दिसून येत आहेत. काही डीपी रस्ते विकास आराखड्यानुसार विकसित करण्यात आले आहेत़ मात्र काही रस्ते विकसित न झाल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ पावसाच्या दिवसांत रस्त्यावर खड्डे, चिखल झाल्याने नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. तर काही नागरिकांचा अपघात होऊन जखमी झाले आहेत. याकडे पालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करी असून, स्वत:ला जबाबदार पालिका अधिकारी म्हणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत. पिंपळे सौदागर येथील पी़ के़ चौक ते कुणाल आयकॉन या जीवघेण्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व येथील रहिवासी करीत आहेत. स्मार्ट पिंपळे सौदागरचा हा का ‘स्मार्ट’ रस्ता असा संतप्त सवाल येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत.
येथील ४५ मीटर रस्ता लगत पी़ के़ चौक आहे. त्या चौकापासून जर्वरी सोसायटी समोरून कुणाल आयकॉन रस्त्याकडे १८ मीटर डीपी रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे़ मात्र ते अध्याप होऊ शकले नाही. मिळकतधारक व पालिका प्रशासन यांच्यातील तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता विकसित केला जात नाही. अनेक जागा मालकांनी हा रस्ता पालिकेच्या ताब्यात दिला आहे़ सुमारे ९० टक्के रस्ता पालिकेच्या ताब्यात आहे़ मात्र काही जागा मालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्ता रुंदीकरणास बाधा ठरत असल्याचे बोलले जात आहे. या रस्त्यावर अनेक मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत़ तर काही होत आहेत़ मग पालिकेला रस्ता रुंदीकरण करण्यास कोणती आडचण येत आहे, असे येथील रहिवासी सवाल उपस्थित करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एक क्रमांकाचा मिळकत कर या भागातून भरला जातो़ मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना रस्त्याविना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे़
रस्ते विकसित न करणे कोणाच्या फायद्यासाठी
1पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशस्त रस्त्यांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. रस्ताबाधित जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या नगर रचना विभागाची आहे. मात्र हे विभाग काम करते कोणासाठी, असा प्रश्न यांचे काम पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या जागेवर विकास आराखड्यानुसार आरक्षण पडले तर जागा ताब्यात घेण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष लागावेत ही शोकांतिका म्हणावे लागेल. खरेच हे विभागातील अधिकारी कर्मचारी जनतेच्या हितासाठी काम करतात की, एखाद्या बांधकाम व्यावसायिक किंवा एखादे राजकारण्यांसाठी काम करतात की, कोणाच्या दबावाखाली काम करतात, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अशा कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोण कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे.
प्रशासनाची केवळ आश्वासनांची खैरात
2मागील दीड वर्षांपूर्वी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या़ त्या वेळी ह्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून त्याचे डांबरीकरण करण्यात येण्याचे आश्वासन येथील लोकप्रतिनिधींनी निवडून येण्याच्या अगोदर येथील रहिवासीयांना दिले होते. मात्र निवडून येताच त्यांना या आश्वासनाचा विसर पडली की काय, असा सवाल या निमित्ताने रहिवासी उपस्थित करीत आहेत. कुणाल आयकॉन रस्ता व बीआरटी रस्ता झाला म्हणजे प्रभागाचा विकास झाला काय? या प्रभागातील अनेक विकास आराखड्यातील कामे झाली नाहीत ना उद्यान, ना खेळाचे मैदान, ना भाजी मंडई मग विकास कसला मग ह्यालाच म्हणायचे का स्मार्ट पिंपळे सौदागर, असा प्रश्नही रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिकेचे अधिकारी कामचुकार
विकास आराखड्यातील जे डीपी रस्ते ९० टक्के महापालिकेच्या ताब्यात आले आहेत, अशा रस्त्याचा विकास तातडीने विकसित करण्याचे आदेश तथकालीन आयुक्त राजीव जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले होते. जमीन मालकांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र कामचुकार अधिकारी डोळे झाकून कोणासाठी काम करतात किंवा कोणाच्या भल्यासाठी काम करतात याचे कोडे न सुटण्यासारखे असल्याने जागा ताब्यात नाही़ हे कारण पुढे करून नागरिकांच्या जीवाशी ही खेळ खेळत असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत. काही मिळकतधारक रस्त्याला जागा देत नाहीत तर इमारतीही बांधण्यासाठी महापालिका प्रशासनाने परवानगी देऊ नये़ लाखो रुपये खर्च करून सदनिका खरेदी केली जाते. त्यासाठी महापालिकेला लाखो रुपये मिळकत कर भरायचा. मग मूलभूत सुविधांसाठी वर्षानुवर्षे झगडत राह्याचे ते कशासाठी, असाही सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
अपघाताला जबाबदार कोण?
या रस्त्यावर आतापर्यंत अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. मागच्या वर्षी संजय जगन्नाथ पाटील हे युवक सायंकाळी कामावरून दुचाकीवरून घरी जात असताना या रस्त्यावर चिखलात गाडी घसरून पडले होते. यात त्यांचा हात मोडला होता. आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. रोजच होत आहेत. अजून किती अपघात महापालिका प्रशासनाला हवे आहेत, म्हणजे या रस्त्याचे काम मार्गी लागेल. याला जबाबदार कोण, महापालिका प्रशासनाचे अधिकारी की, जागा मालक, असा सवाल येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत. खरे तर पावसाच्या अगोदर या रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते़ मात्र ते होऊ शकले नाही. महापालिकेचे नगर रचना विभाग या रस्त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी गांभीर्याने पहातच नसल्याचे दिसून येते. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे फक्त डागडुजी केली जात आहे. रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र ना रस्त्याचे डांबरीकरण झाले ना रस्त्याचे रुंदीकरण झाले. मात्र फक्त रहिवाशांना आश्वासन मिळाले.
ग्रामीण भागातील पांदण रस्ते बरे
पी़ के़ चौक ते कुणाल आयकॉन रस्ता ह्या रस्त्याची कमालीची बिकट अवस्था झाली आहे. ठिकठिकांणी खड्डे, पूर्ण रस्ता चिखलांनी माखलेला. त्यामुळे एखाद्या खेड्यातील पांदण रस्ता बरा म्हणण्याची वेळा विकसित व स्मार्ट पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांवर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट पिंपळे सौदागरकडे विकासाचे मॉडेल आशा वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मात्र रस्त्यांची अशी अवस्था पाहिल्यानंतर येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ह्याला विकास म्हणायचा कसा एका रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी महापालिकेचे अधिकारी डोळे झाक करीत आहेत़ ते कुणाच्या सांगण्यावरून, असा संतप्त सवाल रहिवासी उपस्थित करीत आहेत.
सांगवीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष
सांगवी : सांगवी परिसरात महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्यांच्या डागडुजी व दुरुस्तीचे दावे दोन दिवसांच्या संततधार पावसाने धुवून काढले असल्याचे दिसून येत आहे. अनेक भागातील अंतर्गत रस्ते पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे, पाण्याची डबकी व चिखलमय झाल्याने परिसरातील नागरिकांना चालताना व वाहने नेताना अडचणीचे ठरत आहेत.
सांगवीतील जुनी सांगवी येथील ममतानगर, मुळा नदी किनारा लगतचा मुख्य रस्ता तसेच मधुबन सोसायटीमधील मुख्य रस्त्यावर तसेच नव्या सांगवीतील काटेपुरम चौक ते राजमाता जिजाऊ उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल व जागोजागी खड्डे झाल्याने वाहनचालक व पादचारी नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
मुख्य रस्त्यावर खोदकाम होत असल्याने वाहचालक आणि पादचाºयांची अडचण होत आहे. वाहतूककोंडी व चिखल यामुळे भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून वाहनचालकांमध्ये बाचाबाची व अरेरावी होत आहे. विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे., असे स्थानिक नागरिक प्रभाकर हिंगे म्हणाले.
काटे पुरम चौक येथील रस्ता गेल्या महिनाभरापासून दुरुस्ती अभावी रखडला असून, या रस्त्यावर शाळा असून, पीएमपीएल बस ही जात असतात़ ह्या रस्त्यावर गेल्या महिन्यात भूमिगत पाईपलाईन व चेंबरचे काम हाती घेण्यात आले. परंतु कामाचा वेग पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम कासव गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे कामे या आधीही करण्यात आली.
परंतु राहादरीच्याच रस्त्यासाठी वेळ का लावला जात आहे, असा नागरिकांचा प्रश्न आहे. पालिकेकडून रहदारीच्या ठिकाणी लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे़ परंतु शाळा आणि बसेस या मार्गावर असताना दुरुस्तीचे काम लवकर न केल्याने सदर रस्त्यावर सकाळी आणि शाळा सुटल्यानंतर वाहनांचा खोळंबा होतो. पादचाºयांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
नव्या सांगवीतील रस्त्यांची विकासकामे करताना नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेण्यात आली पाहिजे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून उपाययोजना होणे आवश्यक होते. ऐन पावसाळ्यात खोदकाम होत असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून चिखल झाला आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- रामलिंग आढाव, रहिवासी, सांगवी