अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांचा महापालिकेने केला गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 02:23 PM2017-09-28T14:23:48+5:302017-09-28T14:24:02+5:30
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्यतत्पर कामाबद्दल महापालिकेच्या वतीने स्थायी समिती सभापती सिमा सावळे व आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात विषय पत्रिकेवरील विषयांशिवाय शहरातील विविध चांगले काम करणाºयांचा गौरव करण्यात आला. तसेच महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील पहिले ई-टॉयलेट उभारणाऱ्या सॅमटेक टेकनॉलॉजीचे संचालक शोभित गुप्ता व सरदार प्रताप सिंग यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान महापनगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील गियार्रोहक अनिल वाघ, सुशील दुधाने, विकास आनंदकर यांनी हरिश्चंद्र गड येथील कोकण कड्यावरील ९०० फूट खोल दरीत गियार्रोहण ट्रेकिंग या क्रीडा प्रकारातील कमांडो रॅपलिंग केलेबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, अमित गावडे, हर्षल ढोरे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे आदी उपस्थित होते.
महोत्सव संयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
पिंपरी-चिंचवड फेस्टीव्हल चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल आयुक्त हर्डीकर आणि सभापती सीमा सावळे यांनी मुख्य संयोजक आणि उप शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, सतीश इंगळे, प्रशांत पाटील यांचा गौरव करण्यात आला. कमी वेळेत फेस्टीव्हलचे आयोजन केले, तसेच महोत्सव चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.