लोकसभेपूर्वीच होणार महापालिका निवडणुका - रामदास आठवले
By नारायण बडगुजर | Published: August 12, 2023 10:07 PM2023-08-12T22:07:21+5:302023-08-12T22:07:38+5:30
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली.
पिंपरी : पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या निवडणुका होतील, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी रामदास आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ या भूमिकेमुळे आमचा ‘आरपीआय’ पक्ष ‘एनडीए’सोबत आहोत. या सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मारकांचे संवर्धन झाले. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहायला पाहिजे. पक्षबांधणीसाठी राज्यात विविध शिबिरे आयोजित केली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळण्याची मागणी करणार आहे.
नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले. त्यामुळे तेथे आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. अशीच मान्यता महाराष्ट्रात मिळावी, यासाठी विधानसभा निवडणुकीतही काही जागांची मागणी करणार आहे. आमच्या पक्षाची मुंबईतही मोठी ताकत आहे. विदर्भात देखील समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे शिर्डी, मुंबई किंवा विदर्भ यापैकी कोणत्याही दोन जागा लोकसभा निवडणुकीत मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे.
संविधान बदलणार असल्याच्या अफवा
एनडीए किंवा भाजप सरकार संविधान बदलणार आहेत, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. संविधान अजिबात बदलणार नाही. लोकसभेच्या अगोदर महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये या निवडणुका होऊ शकतात. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १४ ते १५ जागांची मागणी करणार आहे. त्यातील सात- आठ जागांवर कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते, असे आठवले म्हणाले.
विरोधकांचा गोंधळ
मणिपूरच्या संदर्भातील चर्चा संसदेत व्हायला हवी होती. ती चर्चा विरोधकांच्या गोंधळामुळे होऊ शकली नाही. संसदीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सरकारने त्यासंबंधी चर्चा करण्याचे मान्य केले होते. मात्र, चर्चा न होऊ देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले.