महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील: चंद्रशेखर बावनकुळे
By नारायण बडगुजर | Published: May 7, 2023 11:57 PM2023-05-07T23:57:26+5:302023-05-07T23:58:25+5:30
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला.
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने आता वेळ कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. त्यावेळी निगडी येथे पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बाेलत होते. बावनकुळे म्हणाले, महापालिका निवडणुका घेण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही. पावसाळ्यात निवडणुका घेता येणे शक्य नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील. निवडणुकांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जमा होईल, अशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची आहे. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोहचले पाहिजे.
महापालिकेचे तिकीट मीच देणार...
महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यासाठी पक्षाचे सरल ॲप घरोघरी पोहचले पाहिजे. किती जणांनी किती जणांपर्यंत ॲप पोहचवले आहे याची पाहणी मी स्वत: करणार आहे. त्यावरून महापालिकेत कोणाला तिकिट द्यायचे याचा निर्णय महेश लांडगे नव्हे तर मी घेणार आहे, अशी तंबी बावनमुळे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुकांना दिली.
आमदारांनाही ‘टार्गेट’
पक्षाचे सरल ॲप किमान ६० हजार कुटुंबांपर्यंत पोहचून ते डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. शहरातील पक्षाच्या दोन्ही आमदारांनी हे टार्गेट पूर्ण करणे आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले.
शहराध्यक्ष निवडीसाठी निरीक्षकांकडून चाचणी
प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्याचप्रमाणे भाजपच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, पिंपरी-चिंचवडच शहराध्यक्ष आणि राज्यातील ७५ जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक संबंधित शहर, जिल्ह्यांमध्ये जात आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निरीक्षक वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार. त्यानंतर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय होईल.
कर्नाटकात विरोधी पक्ष हतबल होईल
कर्नाटकची निवडणूक सुरू आहे. त्यात मत मोजणी होईल तेव्हा विरोधी पक्ष हा हतबल झोलेला दिसेल. मोदींच्या नेतृत्वात भाजपचे बहुमतातील सरकार कर्नाटकमध्ये येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.