महापालिका गणेश फेस्टिव्हल : महोत्सवावरून रूसवे फुगवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:39 AM2017-08-29T06:39:35+5:302017-08-29T06:39:42+5:30
महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे.
पिंपरी : महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे. ‘पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल हा मर्यादित दिवस चालणारा गणेश फेस्टिव्हल नाही. गणेशोत्सवात अनेक कलाकारांच्या वेळा मिळत नाहीत. त्यामुळे दिवाळीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता यावेत यासाठी फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत सुरू राहील, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर. एस. कुमार महापौर असताना १९९६ मध्ये पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल सुरूकेला होता. या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. चार दिवस हा फेस्टिव्हल चालत होता.
दरम्यान, गणेश फेस्टिव्हलच्या आयोजनावरून चढाओढ सुरू झाली. त्यामुळे प्रकाश रेवाळे यांनी महापौर असताना फेस्टिव्हल बंद केला. त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव, सांस्कृतिक संस्था आणि पालिकेच्या सहकार्याने एक वर्ष गणेश फेस्टिव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लब यांच्या वतीने गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत होते. यावर्षीपासून महापौर नितीन काळजे यांनी या महोत्सवाचे पुनरुजीवन केले आहे. तर एक ते तीन सप्टेंबरला फेस्टिव्हल जाहीर केला आहे. मात्र, त्याची रूपरेषा अद्याप देखील ठरली नाही.
लक्ष्मण सस्ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल हा मर्यादीत दिवस चालणारा गणेश फेस्टिव्हल नाही. गणेशोत्सवात अनेक कलाकारांच्या वेळा मिळत नाही. त्यामुळे यंदा पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलच्या ऐवजी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल असे नाव दिले आहे. दिवाळीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता यावेत यासाठी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.’’