मापुसकर कुटुंब जपतंय स्वच्छतेचा वारसा!
By admin | Published: February 6, 2017 06:11 AM2017-02-06T06:11:24+5:302017-02-06T06:11:24+5:30
स्वच्छतेचा संदेश देण्यासह बायोगॅस प्रकल्पात काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. सुहास मापुसकर यांच्या कार्याचा वसा त्यांची कन्या आणि पुतणेदेखील जपत आहेत.
मंगेश पांडे , पिंपरी
स्वच्छतेचा संदेश देण्यासह बायोगॅस प्रकल्पात काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. सुहास मापुसकर यांच्या कार्याचा वसा त्यांची कन्या आणि पुतणेदेखील जपत आहेत. युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांच्या आरोग्याबाबत डॉ. मापुसकरांचे वारस त्यांचे कार्य पुढे घेऊन जात आहेत. लहान मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, बालमृत्यूदर, मातामृत्यूदर कमी व्हावा यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील देहूतील डॉ. मापुसकर यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला. मापुसकर यांनी अनेक वर्षे आरोग्य व जनजागृतीबाबत काम केले. मानवी विष्ठेपासून बायोगॅसची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पातून स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश दिला. या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचाच वसा घेत डॉ. मापुसकर यांची कन्या शिल्पा नारायनण (मापुसकर) आणि पुतण्या उल्हास मापुसकर यांचे युनिसेफच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. अप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्रनिकेतन या संस्थेच्या माध्यमातून काम सुरु आहे. बालमृत्यूदर, मातामृत्यू दर यांचे
प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत. आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, अस्वच्छतेमुळे समस्या निर्माण होण्याऐवजी स्वच्छता राखल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, याबाबत जागृती करणे आदी कामकाज सुरु आहे. सध्या राज्यातील वीस जिल्ह्यांत युनिसेफच्या माध्यमातून अप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्रनिकेतन संस्थेचे काम सुरु आहे.