देहूगावात खून; घटनास्थळ केवळ 300 मिटरवर असूनही पोलिस सव्वा तासाने हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:44 AM2018-10-15T01:44:52+5:302018-10-15T01:45:42+5:30
एखाद्या चित्रपटाची ही कथा वाटेल, पण ही देहूगावातील सत्य घटना आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिसांचा वेगळाच अनुभव देहूकरांना आला.
पिंपरी : एका तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. या गंभीर घटनेची माहिती नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य पाहता काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांना पोहोचायला तब्बल सव्वातास लागला. एखाद्या चित्रपटाची ही कथा वाटेल, पण ही देहूगावातील सत्य घटना आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिसांचा वेगळाच अनुभव देहूकरांना आला.
गणेश बलभीम बनगर या २१ वर्षीय तरुणाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना देहूगावातील वडाचा माळ येथील भैरवनाथ मंदिरालगत शुक्रवारी रात्री अकराला घडली. गळ्यावर व पोटावर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळापासून पसार झाले.
या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. पावणेबारा वाजले तरीही पोलीस घटनास्थळी दाखल नव्हते. नागरिक वारंवार देहूरोड पोलिसांना कळवीत होते. मात्र, टीम पाठविली आहे, एवढेच उत्तर मिळत होते. अखेर सव्वातासानंतर सव्वाबाराला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथील गर्दी हटवीत पंचनामा करण्यात आला व दीड वाजता मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, खुनासारख्या गंभीर घटनेतही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास इतका उशीर होत असल्याने पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. छेडछाड, चोरी, मारहाण आदी घटनांत मदत मागण्यासाठी पोलिसांना कळविल्यास तातडीने मदत खरोखर मिळेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस पोहोचण्यास उशीर होण्याबाबत माहिती घेतली असता, ठाण्यापासून इथपर्यंत येण्यास वाहन उपलब्ध नसल्याने उशीर झाल्याचे हवालदाराने सांगितले. त्यामुळे पोलीस ठाण्यांकडील शासकीय वाहनांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दाही पुन्हा अधोरेखित झाला आहे.