मजूर खूनप्रकरणी दोघांना अटक, अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:07 AM2018-08-13T02:07:22+5:302018-08-13T02:07:34+5:30
चिखलीतील पाटीलनगर येथील दगडाच्या खाणीत एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी पोलिसांना आढळून आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला
पिंपरी - चिखलीतील पाटीलनगर येथील दगडाच्या खाणीत एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी पोलिसांना आढळून आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराने आणखी एकाच्या मदतीने या डोक्यात दगड घालून मजुराचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजय प्रल्हाद सोळंके (वय ४०, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपींना अटक केली आहे.
धन पठाणीराणा कामी (वय २५,रा. सोनवणेवस्ती, चिखली, मूळ नेपाळ) आणि त्याचा चुलतभाऊ खेमराज राणा कामी (रा. रावेत, मूळ नेपाळ) अशी आरोपींची नावे आहेत. धन कामी याच्या प्र्रेयसीबरोबर सोळंके याचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर चिडलेल्या आरोपीने चुलत भावाच्या मदतीने हे कृत्य केले. महिलेच्या माध्यमातून सोळंके याला आरोपींनी पाटीलनगर, शेलारवस्तीजवळील खाणीत बोलावून घेतले. आरोपी त्या ठिकाणी सोळंके यास जिवे मारण्यासाठी दबा धरून बसले होते. सोळंके महिलेला भेटण्यासाठी येताच, त्यातील एकाने त्यास पकडले. दुसऱ्याने दोरीच्या साह्याने गळा आवळला. खाली पडताच डोक्यात दगड घातले. नंतर मृतदेह पाण्यात फेकून दिला. आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडल तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक एल एन सोनवणे, पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
मूळचे वाशीमचे असलेले विजय हे सध्या चिखलीत राहत होते. ते दगडखाणीवर मजुरीचे काम करीत होते. शुक्रवारी सकाळी ते घरातून बाहेर गेले होते. मात्र, परत आले नाहीत. सायंकाळी पाचच्या सुमारास दगड खाणीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता हा खून असल्याचे उघड झाले आहे.