आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून; एकाला अटक, खुनाचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 01:29 PM2022-04-20T13:29:50+5:302022-04-20T13:31:25+5:30
खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट...
पिंपरी : चिखली येथे आठ वर्षांच्या मुलाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली होती. लक्ष्मण बाबूलाल देवाशी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गुंडाविरोधी पथक आणि चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. यातील एकाने चौकशीदरम्यान खुनाची कबूली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे एका आरोपीला अटक केली आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपूर्वीच हा परिसर सोडून गेला होता. तो पुन्हा परिसरात कशासाठी आला, असा संशय पोलिसांना आल्याने गुंडाविरोधी पथकाने त्याची माहिती घेतली. सीसीटीव्हीची पोलिसांनी मदत घेतली. चिखली पोलीस दुपारी बारा वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. मात्र आरोपीने साडेअकरा वाजण्यापूर्वीच लक्ष्मणचा खून केला होता. त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिल्याची माहिती आहे. सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून केल्याचे येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आले होते. मुलाचा मृतदेह एका पडक्या पत्राशेडमध्ये आढळून आला होता.
नातेवाइकांचा संताप-
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलाच्या नातेवाइकांनी सोमवारी घेतली होती. हीच भूमिका मंगळवारीदेखील नातेवाइकांनी घेतली होती. यात मागणीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनसमोर नातेवाईक आणि या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. चिखली पोलीस स्टेशनवर मोर्चादेखील काढण्यात आला होता.
उलटसुलट चर्चा-
मृत्यू झालेल्या मुलाचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असून लवकरच याबाबत माहिती दिली जाईल. मात्र ज्या कारणामुळे खून झाला अशी चर्चा सुरू आहे, त्या कारणामुळे खून झालेला नाही हे आतापर्यंतच्या तपासावरून दिसून येते.
- आनंद भोईटे, पोलीस उपआयुक्त