पुण्यात चोर समजून हत्याराने वार करून एकाचा खून; तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 18:05 IST2022-06-18T18:01:31+5:302022-06-18T18:05:01+5:30
मुळशी तालुक्यातील घटना

पुण्यात चोर समजून हत्याराने वार करून एकाचा खून; तीन जणांना अटक
पिंपरी : चोर समजून एकावर हत्याराने वार केला. यात त्याचा मृत्यू झाला. खूनप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीन जणांना अटक केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७) सकाळी नऊच्या सुमारास मुळशी तालुक्यातील रसिकवाडी, जांबे येथे उघडकीस आला.
राजू यादव, असे खून झालेल्याचे नाव आहे. वैभव पंडित गायकवाड (वय २४), समाधान परिहार (वय २२, दोघेही रा. जांबे, ता. मुळशी), करण जयस्वाल (वय २३, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यादव हा रसिकवाडी येथे गेला असता आरोपींनी चोर समजून हत्याराने त्याच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने राजू यादव याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.