Pimpri Chinchwad: देहूरोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून, चौघांना अटक
By नारायण बडगुजर | Published: March 6, 2024 08:47 PM2024-03-06T20:47:05+5:302024-03-06T20:49:39+5:30
देहूरोड परिसरातील विकासनगर येथे बुधवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली. खून प्रकरणी गुन्हा दाखल करत देहूरोड पोलिसांनी चौघांना अटक केली...
पिंपरी : पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाला मारहाण केली. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देहूरोड परिसरातील विकासनगर येथे बुधवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली. खून प्रकरणी गुन्हा दाखल करत देहूरोड पोलिसांनी चौघांना अटक केली.
रोहन राजेश देशमुख (२३), चिक्या उर्फ सुयश विलास देशमुख (२६, दोघे रा. देहूरोड), अमित कैलास वरगडे (२४), वैभव शिवप्पा ओनी (२०, दोघे रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह आदित्य, राजेश देशमुख (रा. देहूरोड) आणि एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशाल विजय थोरी (२४, रा. देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय रामशरण थोरी (४७) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि रोहन देशमुख तसेच इतरांमध्ये पूर्वी भांडण झाले हाेते. त्याचाच राग त्यांच्या मनात हाेता. त्यानंतर बुधवारी रात्री विशाल आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. राेहन देशमुख याच्या आजीने फिर्यादी विजय थाेरी यांच्या पत्नीला फाेन करून तेरे लडकेने राेहन के साथ झगडा किया है, अभी वाे २०-२५ लडके बुलाये है, आज उसकाे छाेंडेगे नही, उसकाे बहुत मारेंगे, अशी धमकी दिली. तसेच राजेश देशमुख याने फिर्यादी थाेरी यांना तेरे लडके का बहुत नाटक हाे गया है, आज उसकाे छाेडेंगे नही, आज उसकाे शाॅट दिखाऐंगे, बहुत मारेंगे और बच गया ताे उसकाे चाैकी में जमा करेंगे, असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर त्यांनी विशाल याला लाकडी दांडक्याने, सिंमेट ब्लॉक, कुंडीने जबर मारहाण करून त्याचा खून केला.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष जाधव, पोलिस अंमलदार प्रशांत पवार, बाबा क्षिरसागर, बाळासाहेब विधाते, सुनील यादव, विजय गेंगजे किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, नीलेश जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
संशयितांना अटक केल्यानंतर मृतदेह ताब्यात
विशाल हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विकासनगर विभाग प्रमुख विजय थाेरी यांचा मुलगा हाेता. त्याच्या खुनानंतर संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली. देहूराेड पाेलिसांनी सातपैकी चार संशयितांना अटक केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.