भांडणाच्या रागातून वृद्धाचा खून; परराज्यात पळून जाण्याच्या तयारीतील आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 07:36 PM2021-09-04T19:36:59+5:302021-09-04T19:37:38+5:30
वृद्धाचा निर्घृण खून करून त्यांचा मोबाईल फोन तसेच पैसे आरोपीने घेतले होते.
पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वृद्धाचा निर्घृण खून केला. त्यानंतर वृद्धाचा मोबाईल फोन व रोकड घेऊन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एकाला भोसरी पोलिसांनीअटक केली. फुगेवाडी येथे गुरुवारी (दि. २) सकाळी साडेआठच्या सुमारास खुनाची ही घटना उघडकीस आली.
रामन्ना गोपाल कटगी (वय ६८, मूळ रा. निरगुंडी, कर्नाटक), असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सोमनाथ म्हेत्रे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगेवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गालगत कटगी यांचा निर्घृण खून करण्यात आला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळून आला नाही. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, आरोपी सोमनाथ हा कटगी यांच्याकडे अधूनमधून येत जात असे. त्यांच्यात यापूर्वी बाचाबाची व भांडण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी सोमनाथ हा रबाळे, ठाणे येथे असून रेल्वेने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ठाणे येथून आरोपीला ताब्यात घेतले.
कटगी यांचा खून करून त्यांचा मोबाईल फोन तसेच पैसे आरोपीने घेतले होते. पोलिसांनी मोबाईल फोन व रोकड जप्त केली आहे. या पैशांवर तसेच आरोपीच्या कपड्यांवर देखील रक्ताचे डाग मिळून आले. आरोपी हा फिरस्ता व बेघर असून त्याच्याकडे उपजिवीकेचे साधन नाही. त्याची उपासमार होत असल्याने तसेच कटगी यांच्यासोबत झालेल्या वादाचा आरोपीच्या मनात राग होता. त्या कारणावरून कटगी यांचा खून केला. आरोपीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली.