लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:14 PM2021-03-22T18:14:50+5:302021-03-22T18:15:17+5:30

वाकड पोलिसांनी छडा लावल्याने १० वर्षांनंतर गुन्हा दाखल 

Murder of a pregnant girlfriend due to force to marriage; Accused, who has been missing for 10 years, confessed to the crime | लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

googlenewsNext

पिंपरी : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे त्याने २०११ मध्ये तरुणीचा खून केला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. याप्रकरणात वाकडपोलिसांनी तपास करीत आरोपी तरुणाला अटक केली.

चांदणी सत्यवान लांडगे (वय २२), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची आई सविता सत्‍यवान लांडगे (वय ५२, रा. बलदेव नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर लक्ष्मण घारे (वय ३२, रा. डोणे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी चांदणी ही हिंजवडी येथील कंपनीत कामाला होती. त्यावेळी आरोपी घारे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी ११ सप्टेंबर २०११ रोजी फिर्यादी यांच्या घरी आला आणि चांदणीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर चांदणी घरी परतली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याबाबत २७ जुलै २०१३ रोजी पिंपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चांदणी घरातून निघून गेली त्यावेळी तिच्याकडे पाच ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले व पायात चांदीच्या दोन पट्ट्या होत्या. 

मागील दोन महिन्यांपूर्वी आरोपी घारे हा मारुंजी येथे भाजी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चांदणीचा २०११ मध्ये खून केला असल्याचे कबूल केले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक एस. एम. पाटील, सहाय्यक फौजदार बिभिषण कन्हेरकर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, दीपक भोसले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, अतिश जाधव, नितीन गेंगजे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दहा वर्षे झोप नाही...
आरोपी घारे याने गळा आवळला त्यानंतर चाकूने गळा कापून तिचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले होते. तसेच घरच्यांशी भांडण करून घरातून निघून गेला. त्यामुळे तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. दरम्यान आरोपी घारे हा महामार्ग व टोलनाक्यावर चहा विक्री करीत होता. मात्र या १० वर्षांच्या काळात तो रात्री झोपू शकला नाही. आज रात्री मी पूर्ण झोप घेऊ शकतो, असे म्हणून आरोपी घारे याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली.

मृतदेहाचा शोध सुरू
आरोपी घारे याने चांदणी हिचा मृतदेह कुठे टाकून दिला होता, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. २०११ मध्ये आरोपी घारे हा चांदणीला घेऊन गेला होता. तेव्हापासून चादणीची आई त्याच्याकडे विचारणा करीत होती. चांदणी माझ्यासोबत आहे, असे प्रत्येक वेळी आरोपी सांगत होता. मात्र चांदणी परत न आल्याने त्याबाबत तिच्या आईने २०१३ मध्ये पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते.

Web Title: Murder of a pregnant girlfriend due to force to marriage; Accused, who has been missing for 10 years, confessed to the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.