पिंपरी-चिंचवड हादरले! मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याने तरुणाचा नदीत बुडवून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:00 PM2021-12-09T18:00:03+5:302021-12-09T18:05:37+5:30
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबरला गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन जणांना अटक केली...
पिंपरी : मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याने तरुणाला पवना नदीत बुडवून खून केला. पिंपळे सौदागर येथे मे २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबरला गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन जणांना अटक केली. राहुल नंदू भालेराव (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुलच्या आईने फिर्याद दिली. ओंकार मिलिंद गायकवाड (वय १९), केदार घनश्याम सूर्यवंशी (वय २२, दोघेही रा. पिंपळे गुरव) यांना अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार, केदार, मयत राहुल आणि एक मुलगी हे मित्र होते. ओंकार आणि केदार यांनी संबंधित तरुणीला बहीण मानले होते. राहुलने त्या तरुणीच्या मांडीला हात लावला. याचा राग आल्याने ओंकार आणि केदारने राहुलला पिंपळे सौदागर येथे पवना नदीत नेले. लोखंडी हातोडी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून नदीच्या पाण्यात बुडवले. यात राहुलचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद होऊन चौकशी झाली. त्यानुसार सात महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला.
पावणेपाच लाख रुपये उकळले
गुन्हा दाखल होण्याची भीती घालून एका मध्यस्थीने आरोपींकडून चार लाख ७० हजार रुपये उकळले. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. संतोष शंकर सरोदे (रा. प्रभातनगर, पिंपळे गुरव), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समीर सतीश रोकडे (वय २६, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी रोकडे, खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी, मयत राहुल आणि संबंधित तरुणी हे पाचजण मित्र होते. फिर्यादी समीरचा मित्र राहुलचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या चौकशीतून सुखरूप बाहेर काढतो. अन्यथा तुमच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती घालून आरोपीने फिर्यादीकडून चार लाख ७० हजार रुपये जबरदस्तीने खंडणी पोटी उकळले.