Pune Crime: पूर्व वैमनस्यातून तरूणाचा खून; दोघांवर गुन्हा तर एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 10:45 AM2021-11-08T10:45:40+5:302021-11-08T10:45:57+5:30
आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुणे रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली
पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरूणाचा खून केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटक केली. तापकीर मळ्याजवळ, रहाटणी येथे गुरुवारी (दि. ४) रात्री १० ते शुक्रवारी (दि. ५) रोजी सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली.
मृत्युंजय कुमार (वय २६, मूळ रा. बिहार), असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. पंचानंद मुन्ना राम (वय २१) आणि जवाहर मांझी (दोघेही रा. मूळ बिहार) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी पंचानंद याला पोलिसांनी अटक केली. सतीश वैजिनाथ वाव्हळ (वय ३३, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी एंटरप्रायझेस या कंपनीच्या मजुरांना राहण्यासाठी रहाटणी येथील तापकीर मळ्याजवळ लेबर कॅम्प तयार केला आहे. या लेबर कॅम्पमध्ये मृत्यूंजय, पंचानंद व मांझी राहत होते. मृत्युंजय आणि आरोपी यांच्यात एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून मृत्युंजयच्या डोक्यात अज्ञात वस्तूने जबर प्रहार केला. यात गंभीर जखमी झाल्याने मृत्यूंजयचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोघेही आरोपी पळून गेले. खुनाची ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच मृत्यूंजयच्या कुटुंबियाना माहिती देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी पंचानंद हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुणे रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आरोपी मांझी हा पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.