निगडीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:53 IST2021-09-30T16:48:09+5:302021-09-30T16:53:29+5:30
दीपक पवार याने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला

निगडीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर खुनी हल्ला
पिंपरी : अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला करून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ओटास्किम, निगडी येथे मंगळवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
दीपक पवार (वय २२, रा. ओटास्किम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहानवाज मुस्ताक शेख (वय १७, रा. ओटास्किम, निगडी), असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हा घरी असताना शेख याचा मित्र असलेला एक अल्पवयीन मुलगा घरी आला. बाहेर फिरायला जाऊ, असे म्हणून त्याने फिर्यादीला घराबाहेर नेले. अंकुश चौक येथील भाजी मंडईच्या पाठीमागे नेऊन मित्राने आणि त्याच्या तीन साथीदारांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दीपक पवार याने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी भाजी मंडई परिसरात दहशत निर्माण केली. त्या दहशतीमुळे लोकांनी त्यांची दुकाने व टपऱ्या बंद केल्या.