माझी रिक्षा माझा परिवार अभियान,रिक्षाचालकांचे ऑनलाइन आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:31 PM2020-07-03T13:31:56+5:302020-07-03T14:39:01+5:30
कोरोना काळात रिक्षा व्यवसाय अडचणीत , राज्यात 8 जणांच्या आत्महत्या
पिंपरी : कोरोना महामारीमुळे रिक्षाव्यवसाय बंद होऊन १०० दिवस झाले. उत्पन्न ठप्प झाल्याने रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक अभिनव पद्धतीने ऑनलाइन आंदोलन करणार आहेत. त्यासाठी माझी रिक्षा माझा परिवार अभियान राबविण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रिक्षा व्यवसाय बंद आहे. काही मोजक्याच रिक्षा रस्त्यावर आहेत. त्यांना देखील पुरेसे प्रवासी उपलब्ध होत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचे पैसेही दिवसभराच्या कमाईतून वसूल होत नाहीत. त्यामुळे रिक्षा चालविण्यासाठी खिशातून पैसे टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून त्यांची उपासमार होत आहे. यातून नैराश्य आल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्यात आतापर्यंत आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्याग्रस्त रिक्षाचालकांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, लॉकडाऊन काळात दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळावी, रिक्षा व्यवसायावरील सर्व निर्बंध उठविण्यात यावेत, रिक्षाचालकांचे कर्ज माफ करावे, रिक्षावरील कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. त्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहे.
रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेतर्फे माझी रिक्षा माझा परिवार अभियान राबविण्यात येत आहे. रिक्षाचालक त्यांच्या घरासमोर मागण्यांचे फलक हातात घेऊन उभे राहणार आहेत. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून सरकारपर्यंत मागण्या पोहचविण्यात येणार आहेत. या अभियानाला पिंपरी येथून बुधवारी (दि. १) सुरूवात झाली. पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, बळीराम काकडे, साहेबराव काजले आदी या वेळी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रिक्षाचालक आत्महत्या करीत आहेत. तरीदेखील सरकार गप्प आहे. त्यामुळे हे ऑनलाइन आंदोलन सुरू केले. रिक्षाचालक घरासमोर रिक्षा उभी करून परिवारासोबत फोटो काढून या अभियानात सहभागी होत आहेत.