नागपूर पॅटर्नच्या ‘स्मार्ट वॉच’ एक्सप्रेसला स्थायी समिती सदस्यांनी लावला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:52 AM2018-12-12T02:52:43+5:302018-12-12T02:52:56+5:30
सद्य:स्थितीचा मागविला अहवाल; चार हजार ५४४ घड्याळे थेट पद्धतीने खरेदीचा डाव
पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेच्या नावाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार ५४४ स्मार्ट वॉच (घड्याळे) थेट पद्धतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब ठेवला आहे. आतापर्यंत महापालिकेत विविध योजनांसाठी नागपूर पॅटर्नचे सल्लागार व कंपनीच्या एक्सप्रेसला तात्पुरता ब्रेक लागला आहे. प्रशासनाने स्मार्ट वॉच योजना राबविण्यास शहरातील सद्य:स्थितीचा अहवाल सादर केल्याशिवाय स्थायी समिती मंजुरी देणार नसल्याची भूमिका सदस्यांनी घेतली आहे.
केंद्र व राज्य शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला मानांकन मिळण्यासाठी शहराची स्वच्छता आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या ठिकाणी आहेत का, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निविदेविना स्मार्ट वॉच थेट खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. दरम्यान, ‘लोकमत’ने या प्रस्तावामागे नागपूर येथे अपयशी ठरलेल्या योजनेचा घाट घालण्यात आल्याचे उजेडात आणले. या घड्याळांची खरेदी मे. आयटीआय लि. (बेंगलोर) या संस्थेकडून थेट पद्धतीने केली जाणार आहे. चार वर्षांसाठी प्रतिनग २८७ रुपये या दराने ४ हजार स्मार्ट वॉच खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी दरमहा १३ लाख ४ हजार १२८ रुपये याप्रमाणे एक वर्षासाठी एकूण १ कोटी ५६ लाख ४९ हजार ५३६ असे एकूण चार वर्षांसाठी एकूण ६ कोटी २५ लाख ९८ हजार १४४ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.
थेट पद्धतीने होणारी घड्याळांची खरेदी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर केली जात आहे. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही आक्षेप घेतला होता. त्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव तात्पुरता तहकूब ठेवला आहे. नागपूर महापालिकेत या विषयी काही तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे पुढील बैठकीत योजनेच्या सद्य:स्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा. त्यानंतर योग्य असल्यास हा प्रस्ताव मंजूर केला जाईल. - विलास मडिगेरी, सदस्य, स्थायी समिती