नालेसफाई फक्त उरली कागदोपत्री

By admin | Published: June 30, 2017 03:47 AM2017-06-30T03:47:17+5:302017-06-30T03:47:17+5:30

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची पूर्ण साफसफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी प्रशासनाला दिले होते.

Nalasefai is the only remaining documentary | नालेसफाई फक्त उरली कागदोपत्री

नालेसफाई फक्त उरली कागदोपत्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची पूर्ण साफसफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, संबंधित विभागाने सोयीनुसार या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे पहायला मिळत आहे. दिघी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, नेहरूनगर, बोपखेल अशा विविध भागांमध्ये नाल्यांमध्ये अद्यापही अस्वच्छता पहायला मिळत आहे.
पिंपळे गुरव : नवी सांगवी, दापोडी व पिंपळे गुरवमध्ये उन्हाळ्यात करण्यात आलेली नालेसफाई फक्त कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
परिसरात मोठा पाऊस झाला नसल्याने गंभीर परस्थिती निर्माण झाली नसली तरी, लहान पावसामुळे नाले तुंबल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी चित्र दिसून येत आहे. कोणत्याही कामाचे टेंडर निघाल्यापासून काम पूर्ण होईपर्यंत कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू असल्याने कामे निकृष्ट दर्जाची केली जातात. त्यामुळे कामे करून अडचण, नाही करून अडचण अशी परस्थिती ठेकेदार व नेतेमंडळीची बनली आहे.
नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात मिसळत आहे. तसेच प्लॅस्टिक कागद व कचरा नदीपात्रात जात आहे. यामुळे पर्यावरणाला आळा घालण्याऐवजी पाठबळ दिले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचे मत मनसेचे राजू सावळे यांनी सांगितले.
बोपखेल : रामनगर भागातील नाल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसामुळे गणेशनगर व रामनगर या भागातील पावसाचे पाणी व सांडपाणी याच नाल्याला येऊन मिळते. मात्र, पाऊस पडण्याअगोदर नाल्याची साफसफाई न केल्यामुळे येथे घाणीचे व व दुर्गंधीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे या भागात रोगराई व साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. महानगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे याचे वाईट परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहेत. तसेच हा नाला पुढे जाऊन नदीला मिळतो. नदीसुद्धा या पाण्यामुळे दूषित होत आहे.
जाधववाडी : कुदळवाडी व जाधववाडी परिसरातील नाल्यांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या. चिंध्या, मोठ्या प्रमाणावर गाळ दिसून येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
अद्याप नालेसफाई नाहीच
सांगवी : सांगवी आणि परिसरातील भागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि स्वच्छता याकडे पालिका आरोग्य व नागरी स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू झाल्याने पवना नदीकडे परिसरातील पाणी वाहून नेणारे नाले आणि छोट्या मोठ्या गटारी अजूनही अस्वच्छ आहेत. ऐन पावसाळ्यात पालिका ही कामे करणार का? हा नागरिकांचा प्रश्न आहे. सांगवी भागातील जुनी सांगवी आणि नवी सांगवीमधील पावसाचे पाणी नालेसफाई अभावी रस्त्यावर साठते. पालिकेने पावसाळ्या आधीच नियोजन करणे गरजेचे असताना अजूनही कोणत्याही प्रकारची स्वच्छता मोहीम सुरू नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. सांगवी भागातील मुळानगर, पवारनगर, जुनी सांगवीतील मुख्य बस स्थानक, नवी संगवीतील कृष्णा चौक, काटे चौक आदी परिसरातील नालेसफाई अजून झालेली नाही.
डागडुजीअभावी रस्त्यावर साचले तळे
पिंपळे गुरव : येथील मोरया पार्क गल्ली क्रमांक २ या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिक व शाळकरी मुलांना रस्त्यावर ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पाण्याची व्यवस्था केली जात नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे पाणी साचत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर एक फूट पाणी असल्यामुळे पाण्यातून रस्ता शोधताना मोठी कसरत करावी लागते. तसेच रस्त्यावरून दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगाने दामटतात.
निगडीत सफाई अभावी नाल्यांची दुर्गंधी
निगडी : सेक्टर क्रमांक २२ मधील बौद्धनगर येथे असलेल्या नाल्याची साफसफाई अभावी दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा आणि डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. या नाल्यामध्ये केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्या जास्त प्रमाणात असल्याने या नाल्यातून सांडपाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे. नाल्याच्या सभोवताली असणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. यामुळे या नाल्याची नियमित साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
ऐन पावसाळ्यात नाले दुरुस्तीची कामे-
दिघी : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे दिघीतील नालेसफाई व दुरुस्ती कामांची घाई सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत असून चेंबरच्या नादुरुस्तीमुळे परिसराला अनेक ठिकाणी गटारगंगा तयार झाल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या अगोदर परिसरातील नाल्यांची साफसफाई व दुरुस्ती करण्यात येते. या वर्षीसुद्धा नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याची प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र परिस्थिती वेगळी असून कंत्राटदारांमार्फत करण्यात येत असलेली कामे फक्त मुलामा देण्याइतपत होत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत. थोड्या पावसातच परिसरातील चेंबर ओसांडून वाहत आहेत. जागोजागी फुटलेले चेंबर तशीच आहेत. दिघी ओढ्याजवळील आळंदी रोडवरील नाल्यातील कामाला ऐन पावसाळ्यात सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मग पावसाळ्याच्या अगोदर कुठली कामे केलीत हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून दिघीतील परिस्थिती याहूनही बिकट होऊ शकते.

Web Title: Nalasefai is the only remaining documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.