भाजपा प्रदेशच्या नावांवर शिक्कामोर्तब
By admin | Published: May 20, 2017 05:09 AM2017-05-20T05:09:28+5:302017-05-20T05:09:28+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे माउली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांच्या नावावर
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे माउली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांच्या नावावर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अखेर अंतिम शिक्कामोर्तब झाले. भाजपाकडून प्रदेशने सुचविलेलीच नावे अंतिम ठेवण्यात आली.
त्यामुळे नाराज झालेल्या दोन्ही आमदार व समर्थकांनी निवडीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.
महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार पाच जणांची महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करावयाची होती. त्यानुसार भाजपाकडे तीन तर राष्ट्रवादीकडे दोन स्वीकृत नगरसेवकपद आले.
भाजपाने मोरेश्वर शेडगे, माउली थोरात आणि बाबू नायर यांची, तर राष्ट्रवादीने भाऊसाहेब भोईर व संजय वाबळे यांची नावे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, थोरात आणि नायर यांच्या नावावरून आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राडा केला होता.
पिंपरीतील भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावरून भाजपाकडून स्वीकृतची नावे बदलणार असल्याची चर्चा होती. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वीकृतच्या नावाबाबत कोणताही बदल होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते.
दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाचही जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्यामुळे भाजपाच्या नावांबाबत अनेकांना उत्सुकता होती. मात्र, भाजपा प्रदेशने पाठविलेल्या तीनही नावांवर सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वीकृतच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्थानिक नेत्यांपैकी केवळ खासदार अमर साबळे सभागृहात उपस्थित होते.
नोटीसचे वाचन, न्यायालयात जाण्याची सूचना
रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष केतन कांबळे यांनी माउली थोरात यांचे अनधिकृत बांधकाम असल्याचे, तर बाबू नायर हे स्वीकृत नगरसेवकपद मिळविण्यासाठी दाखविलेल्या संस्थेचे पदाधिकारी नसल्याने त्यांची स्वीकृतपदी निवड करता येत नसल्याचे आयुक्तांना बजावण्यात आलेल्या कायदेशीर नोटिसीत म्हटले होते. नगरसचिवांनी नोटीसचे वाचनही केले.
आयुक्तांनी या पाचही जणांची स्वीकृतपदी निवड करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला असून या विषयास मंजुरी द्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते योेगेश बहल यांनी केली. कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर याविषयास मंजुरी देण्यात आली.
पोलीस बंदोबस्त
स्वीकृतसाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या नावांवरून भाजपाच्या कार्यालयासमोर राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील स्वीकृतच्या निवडीवेळी महापालिका परिसरात मुख्य प्रवेशद्वारासह सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.