भोसरीत ८४१३ मतदारांची नावे यादीतून ‘डिलिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:32 PM2018-08-01T17:32:52+5:302018-08-01T17:39:56+5:30
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या सर्व मतदार संघात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
पुणे: आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाकडून मतदार याद्यांची दुरुस्ती मोहीम सुरु आहे. यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)घरोघरी जाऊन पहाणी करून मयत, दुबार व स्थलांतरी अशी एकूण ८ हजार ४१३ मतदारांची नावे यादीतून ‘डिलिट’ करण्यात आली आहेत. नावे डिलिट केलेल्या मतदार याद्या निवडणूक कार्यालयात लावण्यात आल्या असून, यावर काही हरकत असल्यास त्वरीत कार्यालयात लेखी देण्याचे आवाहन तहसिलदार सुषमा पाटील यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या सर्व मतदार संघात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मयत, दुबार आणि स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात येणार आहेत. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांनी घरोघरी जाऊन तपासणी करून असे मतदार शोधून काढले आहेत. या सर्व मतदारांची नावे आता यादीतून वगळण्यात येणार आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात २०४ मयत, १ हजार ४८० दुबार मतदार आणि ६ हजार ७२१ मतदार स्थलांतरीत झालेले मतदार आढळून आले आहेत. या सर्व ८ हजार ४१३ मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात आली आहेत. या सर्व याद्या पिंपरी चिंचवड महापालिका, मतदार नोंदणी अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. मतदार यादीतून नावे डिलिट केलेल्या मतदार यादी संदर्भांत काही हरकती, सूचना असल्यास १० आॅगस्ट पूर्वी संबंधित कार्यालयात जाऊन लेखी देण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.