Chinchwad By-Election | नाना काटेंकडे सहा लाखांची बंदूक, राहुल कलाटे यांच्याकडे ५८ कोटींची जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:52 PM2023-02-09T13:52:03+5:302023-02-09T13:57:41+5:30
उमेदवारांनी अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मालमत्तेची माहिती दिली आहे...
पिंपरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्याकडे सहा लाख रुपयांची एक बंदूक आहे. तसेच त्यांच्याकडे १० लाखांचे सोन्याचे दागिने असून, बँकेचे १ कोटी ९० लाखांचे कर्ज आहे. तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्याकडे ५८ कोटींची जमीन आहे.
नाना काटे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मालमत्तेची माहिती दिली आहे. मुखई, पिंपळे सौदागर येथे जागा आहे. त्याची ४ कोटी २१ लाख ६० हजार किंमत आहे. रहाटणी येथील बिगरशेती जागेची किंमत १ कोटी ६५ लाख इतकी आहे. पिंपळे सौदागर, ताथवडे येथे विकसित केलेल्या वाणिज्य इमारतीची किंमत ८ कोटी ४५ लाख इतकी आहे. पिंपळे सौदागर येथील निवासी इमारतीची किमत ९८ लाख आहे. बँकेचे १ कोटी ९० लाखांचे कर्ज आहे. काटे यांचा शेती, हॉटेल व बांधकाम हा व्यवसाय आहे. त्यांचे अकरावीपर्यंत शिक्षण झाले आहे.
सोने ३५० ग्रॅम अन् अर्धा किलो चांदी...
पत्नी शीतल काटे यांच्याकडे ५० हजारांची रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात ५ लाख ७० हजार १०८ रुपये आहेत. सोन्याची ३५० ग्रॅमचे १७ लाख ५० हजार किमतीचे दागिने आहेत. ५०० ग्रॅमचे ६० हजार मूल्याचे चांदीचे दागिने आहेत. त्यांच्याकडे १ लाखाची रोख रक्कम आहे. विविध बँक खात्यांत एकूण २ कोटी ८ लाख ७८ हजारांची रक्कम आहे. प्राइड रिॲलिटीला १ कोटी १८ लाख ५२ हजारांचे आणि हॉटेल शिवार गार्डनला १३ लाख ६ हजारांचे कर्ज दिले आहे.
राहुल कलाटेंची संपत्ती-
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांच्याकडे ५८ कोटींची जमीन व दीड कोटी मूल्याच्या दोन सदनिका आहेत. तसेच ५५ हजारांचे एक रिव्हॉल्व्हर आहे. कलाटे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेविषयी माहिती दिली आहे.
राहुल कलाटे यांच्याकडे ९२ हजार ६४० इतकी रोख रक्कम आहे. तर ५८ कोटींची जमीन आणि दीड कोटी मूल्याच्या दोन सदनिका आहेत. १५ तोळ्याचे ५ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. बँकेचे १ कोटी १० लाख ७ हजारांचे कर्ज आहे. त्यांच्या विविध बँक खात्यात ५६ लाख ४७ हजार १४४ रक्कम बचत ठेव आहे. खेड तालुक्यातील सोळू व नेरे येथे ६० लाख ३६ हजार किमतीची शेतजमीन आहे. तसेच वाकड, बोपखेल, चिंबळी, पुनावळे आदी ठिकाणी बिगरशेती जमिनी आहेत. त्याची एकूण किंमत ५७ कोटी ९७ लाख ८७ हजार ४५१ आहे. रहाटणी, वाकड येथील दोन सदनिकांचे मूल्य १ कोटी ४५ लाख आहे.
५२ तोळे सोने अन् दोन किलो चांदी...
कलाटे यांचा शेती व व्यापार हा व्यवसाय आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांचे बी. कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांच्या पत्नी वृषाली कलाटे यांच्याकडे ५२ तोळ्याचे ३१ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. तर, १ लाख २० हजारांची २ किलो चांदी आहे. पत्नीच्या बँक बचत खात्यात २३ हजार ७०७ रक्कम आहे.