नारायण सुर्वे महाराष्ट्राचे कबीर : नागनाथ कोतापल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:35 AM2018-08-24T03:35:30+5:302018-08-24T03:37:06+5:30
सुर्वे यांनी माणूस नावाच्या गोष्टीला प्रतिष्ठा दिली, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.
पिंपरी : पद्मश्री नारायण सुर्वे हे महाराष्ट्राचे कबीर होते. त्यांच्या कवितेमध्ये नाट्य अंतर्भुत होते. स्वप्नरंजनाच्या पलीकडे जाऊन सुर्वे यांनी कविता लिहिल्या. त्यामुळे त्यांची प्रत्येक कविता अविस्मरणीय ठरली. सुर्वे यांनी माणूस नावाच्या गोष्टीला प्रतिष्ठा दिली, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.
पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने नेरळ येथे ‘मास्तरांच्या सावलीत-काव्यजागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कोतापल्ले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, केसरी टूर्स भोसरीचे संचालक अरुण इंगळे, पत्रकार अनिल कातळे, मुकुंद आवटे आदी उपस्थित होते.
कवी भगवान निळे, चंद्रकांत वानखेडे, डॉ. पल्लवी बनसोडे यांना मान्यवरांच्या हस्ते नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले. काव्य मैफिलीत भारत दौंडकर, प्रशांत केंदळे, विलास हाडवळे, गीतेश शिंदे, नूतन शेटे, राजेंद्र वाघ, संकेत म्हात्रे या कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संयोजन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले़ संयोजन साह्य गणेश घारे आणि कल्पना घारे यांनी केले.