Narendra Modi in Pune| PM नरेंद्र मोदी पुणे दौरा: बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:23 PM2022-03-05T20:23:20+5:302022-03-05T23:11:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे रविवारी येणार आहेत...
पिंपरी : महामेट्रोच्या पुणे आणि पिंपरी येथील प्राधान्य मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सतर्कता म्हणून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे रविवारी येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम किंवा दौरा नाही. मात्र या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहर पोलीस दलाच्या हद्दीतून जाणार आहेत. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्यातील एक पर्यायी मार्ग देखील शहर पोलीस दलाच्या हद्दीत आहे.
जडवाहतुकीला बंदी-
सुरक्षेच्या कारणास्तव ननावरे भुयारी मार्ग ते सूसगाव रस्ता या मार्गावर रविवारी (दि. ६) सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीत जड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा शनिवारपासून (दि. ५) तैनात केला आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे.
बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी-
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा ताफा जाणार आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे तसेच सूस-पाषाण येथील ननावरे भुयारी मार्ग ते सूसगाव रस्ता या मार्गावर बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून तसेच श्वान पथकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. वाहनांचीही पाहणी, तपासणी केली जात आहे.
ननावरे भुयारी मार्ग ते सूसगाव रस्त्यावर असा असेल बंदोबस्त
पोलीस उपायुक्त - १
सहायक आयुक्त - ३
पोलीस निरीक्षक - ९
पोलीस उपनिरीक्षक - १५
कर्मचारी - १६०