नाशिक फाटा ते चांडोली होणार सहापदरी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:21 AM2017-12-13T03:21:51+5:302017-12-13T03:22:50+5:30
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली (खेड) रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. या २९.९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १०१३.७८ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.
पिंपरी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली (खेड) रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. या २९.९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १०१३.७८ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. येत्या दीड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
नाशिक फाटा ते चांडोली (खेड) सहा पदरीकरणासह दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करणार आहे. चाकण येथे २.२५ किलोमीटर, मोशी येथे २.५५ किलोमीटर, तर चिंबळी येथे ७०० मीटर लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, कुरुळी, महाळुंगे, आळंदी फाटा आदीसह विविध ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. स्पाईन रोड, वाकी खुर्द येथे वाहनांसाठी ओव्हरपास करण्यात येणार आहे. तसेच इंद्रायणी व भामा नदी अशा दोन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणाºया ठिकाणी स्थानिक वाहतूक भुयारी मार्गाने तर लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी त्यावरील सहा पदरी महामार्गाने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला भूसंपादनासह सुमारे दोन हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.
नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहा पदरीकरण व्हावे. यासाठी चार वर्षांपासून मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेकदा बैठका झाल्या. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर १४ जानेवारी २०१६ ला या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया दीड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करणार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.