रोजलॅन्ड रेसिडन्सी सोसायटीला भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 11:35 PM2017-09-28T23:35:39+5:302017-09-28T23:39:45+5:30
पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या शहरविकास मंत्रालयातर्फे सोसायटी सदस्यांना हा पुरस्कार स्विकारण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
याविषयी रोजलॅन्ड रेसिडन्सी सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर म्हणाले की, भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोसायटीमध्ये स्वच्छता करण्यासाठी प्लॅस्टीक व ई-वेस्ट गोळा करण्यास सुरुवात केली. पुढे आम्ही ओला कचरा, पालापाचोळा गोळा करुन त्यापासून खत निर्मिती सुरु केली. यामध्ये २० ते २५ कुटुंबे आता घरच्या घरी खत निर्मिती करतात.
सोसायटीतर्फे अन्य सदस्यांनाही खत निर्मितीसाठी मार्गदर्शन केले जाते. यानुसार सोसायटीमध्ये तीन महिन्याला एक टन खत निर्मिती होते. हे खत सध्या सोसायटीच्या बागेतच वापरले जाते. मात्र खत निर्मिती पाहता राज्य सरकारने इतर काही संस्थानाही खत विकण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. हा जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आहे. यासाठी सिद्धार्थ नाईक, आनंद दप्तरकर व सोसायटीची व्यवस्थापकीय समिती आणि सोसायटीच्या रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले.
केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत मोहिमे'त सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी चिंचवड मधील रोजलँड रेसिडन्सिने 'आपले घर' ही संकल्पना राबविली. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांच्या संकल्पनेतून एक व्हिडीओ देखील बनविण्यात आला आहे. रोजलँड रेसिडेन्सीने कच-याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला आहे. ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा अशा प्रकारे कचºयाचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कच-याचे घरच्या घरीच कंपोस्ट खत बनविण्यात येते. पालापाचोळा किंवा नैसर्गिक सुका कचरा झाडांच्या बुंध्याला टाकून तसेच खतनिर्मिती करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. तर ई-कचरा कमिन्स इंडिया कंपनीला दिला जातो. स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे सध्या सोसायटीमधून जाणारा कचरा ३०-४० टक्क्यांनी घटला आहे. २ आॅक्टोबर, २०१८ पर्यंत सोसायटीमधून कोणत्याही प्रकारचा कचरा बाहेर जाऊ न देता सर्व कच-याचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे.