पिंपरीमध्ये 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 05:51 PM2018-01-26T17:51:14+5:302018-01-26T17:52:02+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे
पिंपरी – निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रती राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासियांच्या मनात वृद्धींगतहोण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, , अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, अमित गोरखे उपस्थित होते.
यावेळी ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव म्हणाले, भक्ती शक्ती चौक हा भक्ती आणि श्क्तीचे प्रतीक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वात उंचीचा राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. शोर्य, विरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येवू अथवा तिरंग्यात शरिर झाकून येवू अशी शपत घेतात. कारगीलच्या युध्दा मध्ये विजय प्राप्त करुन तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली तेव्हा पासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.
निवृत कर्नल सदानंद साळुंके म्हणाले, भक्ती शक्ती चौकातील देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासियांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कुठेही घाण करु नका. कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्व इतरांना ही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून स्वत: मधील देशभक्ती जागृत ठेवणे ही गजेचे आहे.
महापौर नितीन काळजे म्हणाले, आज पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणांची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वात (107 मीटर) उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहिल. स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 मध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेवून शहर स्वच्छ मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक येणे कामी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले
स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिन हा ख-या अर्थाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याचा दिवस असून त्यांनी आपल्या देशाला दिलेली सर्वात मोठी अनमोल देनगी म्हणजेच संविधान होय. सर्वांना समान हक्क व न्याय देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहरात उभारल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्र प्रेम जागृत झाले आहे.
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावराणे प्रत्येक नागरिकाच्या मनात देश प्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या एतिहासिक क्षणाचा साक्षिदार झाला आहे. हे शहर आपले आहे अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकास कामात सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील एकमेव स्वच्छ, सुंदर व विकसनशिल शहर म्हणून ओळखले जाईल असे ते यावेळी म्हणाले.
शहरातील मनपा शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगातील वेशभुषा परिधान करुन तिरंगी रंगातील हजारो फुगे आकाशात सोडले. भक्ती शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाहून निघाला होता. सुमारे दहा हजार पेक्षा अधिक नागरिकांनी या एतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती शक्तीचा परिसर भारत माता कि जय व बंदेमातरम च्या घोषणेने दुमदुमूनगेला होता.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधीनी शाळेच्या पथकाने ध्वज गीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. या कार्यक्रमापूर्वी संदिप पंचवाटकर यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.