पालखीतळावर ३० मीटर उंचीवर फडकणार राष्ट्रध्वज
By admin | Published: December 22, 2016 11:53 PM2016-12-22T23:53:30+5:302016-12-22T23:53:48+5:30
येथील पालखीतळावर लोकसहभागातून ३० मीटर उंचीवर राष्ट्रध्वज फडकणार असून, सासवडच्या वैभवात भर पडणार आहे,
सासवड : येथील पालखीतळावर लोकसहभागातून ३० मीटर उंचीवर राष्ट्रध्वज फडकणार असून, सासवडच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. २६ जानेवारी २०१७ रोजी हा ध्वजवंदन कार्यक्रम होईल.
पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक महत्त्व असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचे देशप्रेम जागृत राहावे म्हणून शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम करण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वांचा सहभाग असावा म्हणून राष्ट्रध्वजाचे स्टिकर बनविण्यात आले असून, त्याचा स्वेच्छेने फक्त प्रत्येकी एक रुपया घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थी जास्त स्टिकर वाटप करतील, त्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ,अशा स्वरूपातील राष्ट्रध्वजाची प्रतिकृती देण्यात येईल.
पालखीतळावर उभारण्यात येणारा हा ध्वज उभारण्यास सासवडसह पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. याबाबत शहर युवक अध्यक्ष सागर जगताप, नंदकुमार जगताप, प्रा. शशिकांत काकडे, शिवाजी कोलते, रोहित इनामके यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.(वार्ताहर)