इंद्रायणी नदीला गटारगंगेचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:08 AM2019-04-01T01:08:48+5:302019-04-01T01:09:33+5:30
आंबी व वराळेमधील स्थिती : दुर्गंधीयुक्त पाण्याचा होतोय त्रास
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच काही गावातील दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा या नद्यांचे पात्र पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. या नद्यांचे पाणी अमृत मानले जाते. तर याच पाण्यावर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. मात्र सध्या या नद्यांचे पाणी दूषित झाले असून, जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. औद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास झाल्याने नागरीकरणात वाढ होत आहे. कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी, तसेच कचरा ओढे व नाल्यातून नदीपात्रात सोडले जाते. तसेच गावोगावचे व गृहप्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रासपणे नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच नदीपात्रात कपडे, म्हैशी ,बैल, गायी व इतर जनावरे धुतली जातात. देवाच्या पूजेचे साहित्य पात्रात टाकले जाते.
पाणी हे जीवन आहे. मावळ तालुक्यात मुबलक पाणी मिळत आहे. मात्र नदीच्या उगमस्थानापासून प्रदूषण सुरू होते. ग्रामपंचायत, नगर परिषद व औद्योगिक कारखान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे जोडलेल्या जलवाहिनीच्या नदीपात्राजवळची स्थिती खूपच बिकट आहे. पाणी शुद्धीकरण केले तरी त्यातील रासायनिक घटक पाण्यातच असल्याने जलचर, प्राणी व मानवाचे आरोग्य धोक्यात आहे.