नवरात्रोत्सवही सार्वजनिक

By admin | Published: October 1, 2016 03:41 AM2016-10-01T03:41:34+5:302016-10-01T03:41:34+5:30

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील बहुतांश नवरात्रोत्सव मंडळांची विद्युत रोषणाई व मंडप सजावट

Navratri is also public | नवरात्रोत्सवही सार्वजनिक

नवरात्रोत्सवही सार्वजनिक

Next

पिंपरी : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील बहुतांश नवरात्रोत्सव मंडळांची विद्युत रोषणाई व मंडप सजावट पूर्ण झाली आहे. उद्योगनगरीत सुमारे ४७४ मंडळांना उत्सवासाठी पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने इच्छुकांनी उत्सव दिमाखदार करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. महिलांचा सहभाग सर्वाधिक असल्यामुळे विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यावर इच्छुकांचा भर आहे. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांची संख्या वाढली आहे.
नऊरात्रींच्या या उत्सवात देवीचा जागर करण्यासाठी शहरातील विविध मंडळांनी विविध शासकीय परवानगी काढण्यास सुरुवात केली आहे. घटस्थापनेचा मुहूर्त सकाळपासूनच सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड परिमंडळ तीनच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांमधील नोंदणीनुसार, पिंपरीमध्ये ५७, चिंचवड ४२, निगडी ८८, भोसरी ८३, एमआयडीसी २७, सांगवी ३४, चतु:शृंगी ३९, वाकड ८३ आणि हिंजवडीत २१ अशा एकूण ४७४ ठिकाणच्या मंडळांकडून उत्सवासाठी परवानगी घेतली आहे.
दांडिया खेळण्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. अशा वेळी सोनसाखळी चोरी घडण्याचीदेखील शक्यता असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मंडळांच्या ठिकाणी साध्या
वेशातील पोलीस कर्मचारी तैनात राहणार असून, चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. सोनसाखळी
चोरी करताना आढळल्यास थेट
गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली. (प्रतिनिधी)

रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक बंद
नोंदणी करतेवेळी मंडळप्रमुखांना दिलेल्या सूचनेनुसारच आवाजाची मर्यादा ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. रात्री १०च्यानंतर ध्वनिक्षेपक बंद करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. केवळ अष्टमी आणि नवमीच्या दिवशीच रात्री १२पर्यंत स्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शक्य असल्यास सीसीटीव्हीदेखील बसविण्याची सूचना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच या उत्सवातदेखील मंडळप्रमुखांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, या ग्रुपमध्ये पोलीस कर्मचारीदेखील असणार आहे. या ग्रुपच्या माध्यमातून मंडळप्रमुखांना सुरक्षिततेसंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात येणार आहेत.

Web Title: Navratri is also public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.