नयना गुंडे यांनी केली बीआरटी मार्गाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:58 AM2018-08-31T00:58:35+5:302018-08-31T00:59:07+5:30
पिंपरी : नव्याने सुरू करण्यात आलेल्या दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी बुधवारी पाहणी केली. या दरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या दापोडी ते निगडी मार्गातील बसेसच्या संचलनाबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अपुऱ्या बसेस, बे्रक डाऊन तसेच प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गुंडे यांनी मार्गाची पाहणी केली.
पाहणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व परिस्थितीच्या अनुषंगाने आगार व्यवस्थापक व कार्यशाळा अधीक्षकांनी तातडीने पावले उचलण्याचे आदेश गुंडे यांनी दिले. या मार्गावर अधिकाºयांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट द्यावी, अशा सूचनाही गुंडे यांनी दिल्या. या वेळी पीएमपीचे महाव्यवस्थापक (वाहतूक) विलास बांदल, सुरक्षा अधिकारी अविनाश डोंगरे आदी उपस्थित होते.
नयना गुंडे यांच्याकडे या वेळी प्रवाशांनी अनेक तक्रारी मांडल्या. सुस्थितीतील बस उपलब्ध करून देण्याची मागणीही प्रवाशांनी या वेळी केली.