राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फिरकेनात पालिकेत
By admin | Published: March 29, 2017 01:55 AM2017-03-29T01:55:25+5:302017-03-29T01:55:25+5:30
गेल्या १५ वर्षांत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वावर कायम होता.
पिंपरी : गेल्या १५ वर्षांत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वावर कायम होता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाची सत्ता गेली. भाजपाने बहुमत मिळवून सत्ता काबीज केली आहे. सत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा महापालिकेतील वावर कमी झाला असून, भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.
यापूर्वी विरोधी पक्षाचे साधारण १४ ते १५ नगरसेवक असत. त्यामुळे विरोधी पक्षाला दिलेला कक्ष पुरेसा पडत होता. या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत आली. विरोधी बाकावर बसण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली. भाजपाचे ७७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षासाठी उपलब्ध करून दिलेला कक्ष ३६ नगरसेवकांना बसण्यास पुरेसा नाही. त्यामुळे मोठ्या आकाराची जागा असलेला कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. पूर्वी पक्षनेत्यांच्या, तसेच महापौरांच्या कक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमी हजेरी लावायचे.
पक्षाच्या कार्यक़्रमांची, तसेच अन्य बैठका व कार्यक्रमांचे नियोजन त्या ठिकाणी व्हायचे. आता मात्र पुरेशी जागा उपलब्ध होत नाही, हेच शल्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोचते आहे. त्यांनी त्यासाठी आंदोलनाचीही भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
सत्ताधारी म्हणून वावरण्याची जाईना सवय
सत्ताधारी म्हणून वावरण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मानसिकता अद्यापही तशीच आहे. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आता अधिकचा उत्साह संचारला आहे. यापूर्वी कधी तरी महापालिकेत फेरफटका मारणारे कार्यकर्ते अलीकडच्या काळात नियमित महापालिका कार्यालयात दिसून येत आहेत. सत्ताबदलाबरोबर कार्यकर्त्यांमध्येही बदल घडून आल्याचे जाणवू लागले आहे.