पाणी कपातीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 06:12 PM2019-12-04T18:12:43+5:302019-12-04T18:22:32+5:30
पाणी कपातीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला.
पिंपरी : पाणी कपातीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला.
महापालिका भवनासमोरील आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, मंगलाताई कदम, पक्ष प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
वाघेरे म्हणाले, ‘‘पवना धरण शंभर टक्के भरले असतांनाही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे व टँकर लॉबीच्या भल्यासाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा करुन शहरातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे. प्रशासनास याबाबत वारंवार निवेदने, अर्ज देण्यात आली आहेत. आंदोलने केली आहेत. परंतु अद्यापही नियमित पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. शहरात अनाधिकृत नळकनेक्शन रोजरोस होत आहेत. पाण्याची चोरी होत आहे परंतु त्यांच्याकडे प्रशासन सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहे. बाकीची इतर हास्यास्पद कारणे देऊन कृत्रिम पाणी टंचाई करत आहे. त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी आंदोलन केले.
प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी निवदेन स्वीकारले व आठ दिवसात पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले. एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाघेरे यांनी दिला.